ईश्वर ताथवडे यांचा चर्मकार समाज बांधवांकडून सत्कार-समाजाच्या हक्कांसाठी व्यापक जनजागृतीचा निर्धार
मुंबई -(प्रतिनिधी) संत रोहिदास समाज फाऊंडेशनच्या वतीने नुकतीच बांद्रा पूर्व येथे बैठक पार पडली. या बैठकीत नवनियुक्त रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) महाराष्ट्र प्रदेश सचिव, संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेचे संस्थापक-अध्यक्ष, तसेच जनता प्रभाव वर्तमानपत्राचे संपादक ईश्वर ताथवडे यांचा चर्मकार समाज बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.संघटनेचे पदाधिकारी संपत धोंडिबा कदम यांनी उपस्थितांची ओळख करून दिली.
यावेळी ताथवडे यांनी समाजहितासाठी कायदेशीर मार्गदर्शन, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवणे तसेच अडीअडचणीच्या काळात संघटना व समाजबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
चर्मकार महामंडळाऐवजी समाजकल्याणावर भर देण्याची भूमिका
बैठकीत ज्येष्ठ समाजसेवक व मनपा निवृत्त अधिकारी अच्युतराव भोईटे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना ‘चर्मकार समाजाने आता चर्मकार महामंडळाकडे जाण्याऐवजी थेट समाजकल्याण विभागामार्फत आपले हक्क मिळवावेत असे मत व्यक्त केले.
चर्मकार महामंडळाची सद्यस्थिती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की महामंडळ म्हणजे नदीतील पाण्याचे डबके ‘पाणी कमी आणि मासे जास्त’ म्हणजेच निधी अपुरा आणि मागण्या प्रचंड. उलट समाजकल्याण हा सागर आहे, जिथे केंद्र व राज्य सरकारचा मोठा निधी उपलब्ध असल्याचे नमूद करीत त्यांनी समाजातील काही पुढारी निधी हडप करण्यासाठी सामान्य गरजवंतांना अडकवतात. परिणामी गरीब व गरजू समाजबांधवांची फरफट होते. त्यामुळे चर्मकार महामंडळाची संकल्पना जरी समाजहितासाठी राबवली असली, तरी आज त्याचा दुरुपयोग होत असल्याचे वास्तव असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
समाजकल्याणातून मिळणाऱ्या हक्कांची माहिती पोहोचवण्याची गरज
समाजकल्याण विभागामार्फत उच्च शिक्षणासाठी देश-विदेशात शिक्षण, निवास, प्रवास व भोजन खर्च, भूमिहीनांना जमीन, समाजोपयोगी बांधकामांसाठी निधी तसेच उद्योग-व्यवसायासाठी सहाय्य अशा अनेक योजना उपलब्ध आहेत. मात्र, याबाबत समाजातील बहुसंख्य लोकांना माहिती नसणे ही मोठी शोकांतिका असल्याचे भोईटे यांनी अधोरेखित केले.
याच मुद्द्याला दुजोरा देताना सी. के. जाधव (निवृत्त सहसचिव, समाजकल्याण विभाग) यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, समाजकल्याण विभागाकडे भरपूर निधी असूनही त्याचा पुरेपूर लाभ समाजाला मिळत नाही. काही पुढारी किरकोळ आर्थिक लाभासाठी समाजाला राजकीय सत्तेच्या अटींमध्ये अडकवतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत संजय कदम यांनी संघटनेची माहिती दिली, तर महेंद्र कारंडे यांनी संघटनेची ध्येय-धोरणे व मागील तीन वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा मांडला.
यावेळी उपस्थित सर्वांनी समाजहितासाठी योग्य विषयांवर सखोल चर्चा करून लवकरच पुन्हा बैठक घेऊन नागरिकांमध्ये हक्कांविषयी जनजागृती करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.
या बैठकीस संपत कदम, संजय कदम, पांडुरंग चिकणे, सदाशिव कारंडे, महेंद्र कारंडे, राजाराम कदम, ज्ञानदेव वर्पे, अच्युतराव भोईटे, चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी संपत कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत समाजहितासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आणि बैठकीची सांगता करण्यात आली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

