श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्लेचा २४ व्या चंदेरी वर्ष महोत्सवाचे आयोजन
संत-महात्म्यांच्या पादुकांचे पवित्र दर्शन होणार
मुंबई-(प्रतिनिधी)श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले (पूर्व) यांच्या वतीने मठाच्या २४ व्या चंदेरी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक २४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम लक्ष्मी नारायण ग्राऊंड, राम मंदिर, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे संपन्न होणार असून मुंबई व उपनगरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२४ डिसेंबर २००० ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत मठाच्या आध्यात्मिक व धार्मिक कार्याचा गौरव म्हणून हा चंदेरी वर्ष महोत्सव साजरा केला जाणार आहे. भारतीय प्राचीन वेदाचारण गुरुकुल तसेच श्री स्वामी समर्थ मठ यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात श्री दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू शंकर महाराज तसेच विविध संत-महात्म्यांच्या पादुकांचे पवित्र दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यासोबतच रामसेतू शिळेचे पवित्र दर्शन भाविकांना घेता येणार आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ उपलब्ध होणार आहे.
विशेष आकर्षण म्हणून सद्गुरू शंकर महाराजांचे वस्त्र आणि रामसेतू शिळेचे दर्शन आयोजित करण्यात आले असून, या दुर्मिळ व पवित्र दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कार्यक्रम शांततेत व भक्तिभावात पार पडावा यासाठी मठ प्रशासन व स्वयंसेवकांकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या चंदेरी वर्ष महोत्सवात सहभागी होऊन भाविकांनी पवित्र दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ–विलेपार्लेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

