‘एक पोळी होळीची’ उपक्रमातून रुग्णांना सणाचा दिलासा
मुंबई-(प्रतिनिधी)-होळी सणाच्या निमित्ताने गेली आठ वर्षे सातत्याने राबवण्यात येणारा ‘एक पोळी होळीची’ हा सामाजिक उपक्रम यंदाही यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाअंतर्गत टाटा हॉस्पिटल परिसरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पुरणपोळीचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून दरवर्षी होळी सणाच्या निमित्ताने सुमारे १५०० पुरणपोळ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वितरित करण्यात येतात, ज्यामुळे आजारपणामुळे घरापासून दूर असलेल्या अनेक कुटुंबांना सणाचा थोडाफार आनंद अनुभवता येतो. यंदाही या वाटपामुळे रुग्ण आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
हा उपक्रम हर्ष शिरसाट आणि साधना शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती स्वरूप सावंत यांच्या सहकार्याने गेली आठ वर्षे सातत्याने राबवण्यात येत आहे. सणांच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचणे तसेच आपणही समाजाचे देणे लागतो ही भावना समाजात रुजवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमासाठी साधना शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक, विद्यमान मुख्याध्यापिका भिलारे मॅडम, प्रतिक्षा नगर एम-२ वसाहतीचे रहिवासी, तसेच सारीका दाभाडे, संदीप गंजी, सिद्धेश, सचिन निकम, स्वप्नील मोहित यांच्यासह अनेक नागरिकांचे सहकार्य लाभले.
भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. होळीच्या दिवशी अन्नदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम असून, गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तो दिलासादायक ठरल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष पूर्ण झाले असून, भविष्यातही हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे हर्ष शिरसाट ह्यांनी सांगितले.आम्ही फक्त पोस्टमन आहोत अशी त्यांची ह्या बाबतीत भुमिका आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

