सिंधुदुर्ग एलसीबीची मोठी कारवाई; दीड कोटीहून अधिक किमतीचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त
उमेश शेट्ये सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई दि. ४ जुलै २०२६ रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता चौक, ओरोस, ता. सिंधुदुर्गनगरी, जि. सिंधुदुर्ग येथे करण्यात आली.
या प्रकरणी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९), रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर संगतडा, राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३३६(२)(३), ३४०(२) आणि ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू, ३५ लाख रुपयांचा टाटा सिग्मा दहा चाकी ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर आणि ऋषिकेश टोपले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू तस्करीला मोठा आळा बसला असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

