पर्यटन

Royal Mile-कथा एका रस्त्याची..! एस. एम. देशमुख


Edinburgh Castle आणि Holyrood House या दोन ऐतिहासिक वास्तूंना जोडणारा मार्ग म्हणजे Royal Mile. एडिनबर्ग कॅसल हा किल्ला आहे. होलीरूड हाऊस राजवाडा. या दोन्ही वास्तू म्हणजे स्कॉटलंडच्या इतिहासातील महत्वाची वारसा स्थळं.

ज्वालामुखीच्या खडकावर अकराव्या शतकात एडिनबर्ग किल्ला उभारला गेला. असं सांगितलं जातं की, किल्ला व्हायच्या अगोदर देखील तिथं लोकवस्ती होती.किल्ला झाल्यानंतर अनेक वर्षे तेथे स्कॉटिश राजघराण्याचं वास्तव्य होतं. इंग्लंड बरोबर झालेल्या लढायांचा, किल्ल्याला पडलेले वेढे आदि घटनांचा हा किल्ला साक्षीदार राहिलेलाय.

इतिहासातील अनेक चढ-उतार या किल्ल्यानं पाहिलेत. समुद्र सपाटीपासून 130 मिटर उंचीवर आणि मजबूत अशा खडकावर उभा असलेला हा किल्ला जिंकायला अवघड होता असं गाईड सांगतात.

आपल्या अभिमानाचा विषय असलेल्या या किल्ल्याबद्दल स्थानिक गाईड भरभरून बोलतात हे वेगळं सांगायला नको. आपला इतिहास, आपल्या संस्कृतीचा उच्च कोटीचा अभिमान या लोकांना आहे हे त्यांची वाणी आणि कृतीतून वारंवार जाणवत राहतं.

गाईड कितीही कौतूक करू देत, मी मात्र किल्ला पाहून फार प्रभावित झालो असं नाही. ठीक आहे ही माझी प्रतिक्रिया होती. आपल्याकडचे रायगड,शिवनेरी दौलताबाद, सारखे किल्ले किती तरी मजबूत आणि लष्करीदृष्टया अधिक उपयुक्त आहेत.

इथलं वेगळेपण एवढंच की, आपल्या इतिहासाबद्दल सार्थ अभिमान बाळगणाऱ्या स्कॉटिश सरकारनं किल्ल्याचं जतन चांगलं केलं आहे. हजार वर्षांनंतर ही किल्ल्यावरील अनेक वास्तू सुस्थितीत आहेत.

त्या त्यामुळंच इतिहासातील घटना, घडामोडींची माहिती देणारी प्रदर्शनं तेथील विविध दालनांमधून लावलेली आहेत. कुठं मध्ययुगीन काळात राजे, त्यांचे सैनिक कुठली हत्यारं वापरायची याचं प्रदर्शन आहे ,तर कुठं वेगवेगळी हत्यारं जपून ठेवली आहेत.

कुठं वेगवेगळ्या काळात लष्करप्रमुखांना दिली जाणारी मानचिन्हं आहेत तर कुठं अकराव्या शतकांपासून कोणते राजे होऊन गेले त्यांची माहिती, त्यांचे फोटो लावलेले आहेत. एका दालनात वेगवेगळ्या काळात राण्या कुठल्या प्रकारचे दागिने वापरत ते बघायला मिळते, तेथेच राजमुकुट देखील पहायला मिळतो.

इतिहास जतन करणं काय असतं हे किल्ल्यावर फिरताना सतत जाणवत राहतं.. आपल्याकडं इतिहासाचा सोयीचा अर्थ काढून तो आपल्या राजकीय लाभ-तोटयासाठी कसा वापरता येईल यावर लक्ष केंद्रीत केलेलं असतं.

आपल्या गड किल्ल्यांची होणारी पडझड त्याचाच परिपाक. बाहेर तोफा रांगेत उभ्या आहेत.विशेष म्हणजे त्या आपल्या सारख्या गंजलेल्या, बेवारस स्थितीत नाहीत.अगदी सुस्थितीत जतन करून ठेवलेल्या आहेत.

किल्ल्याची तटबंदी वगैरे भक्कम असणारच, पण किल्ल्यांचे दरवाजेही मला विशेष, भक्कम, वाटले नाहीत.किल्ला उंचावर असल्यानं किल्ल्याच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या एडिनबर्ग शहराचा नजारा मात्र सुरेख दिसतो.सारं शहर इथून दिसतं. किल्लावरून दिसणारं सुंदर एडिनबर्ग डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे.

किल्ल्याच्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर
1 स्कॉटस् मैल म्हणजे 1.8 किलो मिटर अंतरावर होलीरुड पॅलेस आहे. हे अंतर कापण्यासाठी जेमतेम पंधरा ते वीस मिनिटं लागतात. दोन्ही वास्तूंना जोडणारा जो दगडी रस्ता आहे तो स्कॉटलंड आणि जगभरात Royal Mile म्हणून ओळखला जातो.

या रस्त्यावरून तत्कालीन राजे – राण्या जा – ये करीत, म्हणजे खाशया स्वारींसाठीचा रस्ता म्हणून हा “रॉयल माईल”. गाईड सांगत होता की , आज जो होलीरुड पॅलेस आहे तेथे पुर्वी एक मठ होता. सोळाव्या शतकात राजा जेम्स चतुर्थ याने परिसराचे रूपांतर राजवाड्यात केलं. आज ही युकेचे राजे स्कॉटलंडला आल्यानंतर याच राजवाड्यात वास्तव्य करतात अशी माहिती गाईडनं दिली.

राजवाडा दुमजली आहे. वेगवेगळी दालनं.त्यामध्ये राजघराण्यातील राजे आणि राणी यांची माहिती, छायाचित्र, समोर सुंदर गार्डन असलं तरी मला हा राजवाडाही फार भव्यदिव्य वाटला नाही. लंडनचा बकिंगहम पँलेस किंवा विंडसर कँसल यापेक्षा किती तरी पटीनं सुरेख आहेत.

किल्ला आणि राजवाडा या दोन वास्तूंपेक्षा मला दोन्ही वास्तूंना जोडणारा “रॉयल माईल” मला अधिक भावला. दगडी रस्ता आहे, फार रूंद ही नाही. मात्र हा रस्ता मध्ययुगीन एडिनबर्गच्या वातावरणाची अनुभूती देणारा. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना उंचंच उंच आणि हजार, हजार वर्षांच्या इमारती, बाराव्या शतकातील एक भव्य चर्च आहे.सेंट जॉईल कँथेड्ल..रस्त्याच्या मध्यभागी असलेले हे चर्च उत्तम वास्तुकलेचा नमुना म्हणून ओळखला जातो.

एडिनबर्ग शहरातील सर्वात जुने घर असलेल्या John Knox House इथं बघायला मिळतं..रस्त्यावरच होलीरूड पँलेसजवळ स्कॅाटिश संसदेची इमारत आहे.. म्युझियम ऑफ चाइल्डहुड देखील या रस्यावर आहे.

रॉयल माइलला जोडणारे दोन मोठे रस्ते एका चौकात मिळतातच परंतू मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. गल्ल्याना Closes किंवा Wynds म्हणतात. प्रत्येक गल्लीची एक स्वतंत्र कथा.. किल्ल्याच्या खाली असलेल्या रेल्वे स्टेशनपासून रॉयल माईलकडे जाणाऱ्या अनेक गल्ल्या आहेत. अगदीच छोट्या, छोट्या. शेकडो पायरयावरून रॉयल माईलकडे जाताना दमछाक होते,
मजा मात्र येते.

रस्त्यावर काही कवी, विचारवंतांचे पुतळे आहेत. किल्ट हे पारंपारिक ड्रेस घालून बॅगपाईप वाजवत उभे असलेले अनेक कलाकार इथं दिसतात. बॅगपाईपचे अत्यंत सुमधूर स्वर वातावरणात वेगळीच रंगत आणतात. काही ठिकाणी फिडेल वाजवणारे कलाकारही भेटतात, हातात माईक घेऊन गाणारे, वेगवेगळे कपडे घालून आपली कला सादर करणारे बहुरूपी यांचीही वाणवा नाही.

रस्त्याच्या दुतर्फा स्कॉटिश वस्तूंची अनेक दुकानं आहेत. तेथे कपडे, जुन्या वस्तू, स्कॉटिश जनतेची आवडती स्कॉच, स्मृतीचिन्ह खरेदी करता येतात..एडिनबर्ग फ्रिन्ज फेस्टिव्हल काळात रस्ते तुडूंब भरलेले असतात, एडिनबर्गला आलेला पर्यटक किल्ला, राजवाडा आणि रॉयल माईलला भेट देतोच देतो त्यामुळं रॉयल माईल कायम गजबजलेला, जिवंत वाटतो.

मला महाबळेश्वरमधील बाजारपेठेच्या गल्लीत फिरायला आवडतं. रात्री नटून खटून सज्ज झालेला महाबळेश्वरचा हा रस्ता सर्व काही विसरायला भाग पाडतो. इथं फिरताना जगात आता दु:ख नावाची गोष्ट शिल्लक नाही असं वाटत राहतं. संदर्भ वेगळे आहेत, वातावरणही वेगळं आहे. पण रॉयल माईलही मला काही काळासाठी सारं काही विसरायला लावणारा वाटला.

आम्ही दोन- तीन तास या रस्त्यावर घालविली. दीड किलो मिटरवर दोन-तीन वेळा ये जा केली. पावसाचे तुषार अंगावर घेत आणि गुलाबी थंडीचा आनंद घेत या रस्त्यावरून फिरताना वेळ कसा गेला कळलंच नाही, मजा आली.

मला एक गोष्ट जाणवली, रॉयल माईल म्हणजे केवळ एक रस्ता नाही.. तो स्कॉटलंडच्या इतिहास, संस्कृती, वास्तूकला, संगीत, परंपरांचा आणि गतकालीन वैभवाचा जिवंत उन्ह अनुभव देणारा परिसर आहे.. आपण या रस्त्यावरून चालू शकलो याचा आनंद नक्की आहे.
(क्रमशः)

लंडन डायरी-भाग सातवा


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *