राजकीय

प्रभाग क्रमांक १८९ मध्ये मनसेचं पारडं जड; महापालिका निवडणुकीत मनसेची बाजी निश्चित


माटुंगा लेबर कॅम्प-(प्रतिनिधी)येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माटुंगा लेबर येथील प्रभाग क्रमांक १८९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने अनुकूल वातावरण तयार झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर सातत्याने केलेल्या समाजोपयोगी कामांमुळे मनसेचा जनाधार दिवसेंदिवस मजबूत होत असून, याचा थेट फायदा येथून निवडणूक लढवणाऱ्या मनसे उमेदवाराला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक १८९ चे शाखा अध्यक्ष सूर्यकांत भालेकर यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील नागरिकांसाठी केलेली भरीव कामगिरी आज निवडणूक वातावरणात निर्णायक ठरत असल्याचे बोलले जात आहे. कोविड-१९ च्या कठीण काळात भालेराव यांनी अनेक गरीब व गरजू कुटुंबांना रेशन वाटप, वैद्यकीय मदत, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देत माणुसकीचा आदर्श ठेवला. संकटाच्या काळात सामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

याचबरोबर रेल्वे रुळालगत असलेल्या आझाद नगर येथील ए वॉर्ड, बी वॉर्ड आणि सी आणि डी वॉर्डमधील झोपडपट्टीवासीयांचे घर निष्कासनापासून वाचवण्यासाठी सूर्यकांत भालेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने केलेले प्रयत्न आजही स्थानिकांच्या स्मरणात आहेत. या प्रश्नावर त्यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत रहिवाशांना दिलासा मिळवून दिला. त्यामुळे भालेकर यांचे नाव आणि मनसेची भूमिका स्थानिक नागरिकांच्या मनात ठळकपणे रुजली आहे.

आजवर केलेल्या या सर्व समाजहिताच्या कामांचा सकारात्मक परिणाम प्रभाग क्रमांक १८९ मधील राजकीय समीकरणांवर होताना दिसत आहे. येथील नागरिकांमध्ये मनसेविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या बाजूने भक्कम जनमत तयार झाल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकूणच प्रभाग क्रमांक १८९ मध्ये मनसेचे पारडे जड होत असून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या सूर्यकांत भालेकर यांच्या सारख्या सशक्त नेतृत्वामुळे यावेळी महापालिका निवडणुकीत मनसे बाजी मारेल असा आशावाद नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *