सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
सिंधुदुर्ग प्रतिनिधी-उमेश शेटये
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ०३.०७.२०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ओरोस खरेवाडी येथील खालसा पंजाबी ढाब्यासमोर, गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत आरोपी १) गोपाळ राजाराम गवस (वय ३४, रा. दापोली, अन्नपूर्णावाडी, ता. सावंतवाडी), २) शिरीष सुभाष गवळी (वय ३५, रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि ३) सिद्धेश सुभाष केसरकर (वय ३४, रा. आळेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, सन २००६ मधील कलम २६(२), ७(३)(ड), २७(३)(इ), ३०(२)(ए), ५९ तसेच भारतीय न्याय संहिता, सन २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत आरोपींकडून ३० लाख १३ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये २१ लाख ६३ हजार ४५० रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ तसेच ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा अशोक लेलँड बडा दोस्त मालवाहू वाहनाचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जयकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी केली. याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे


