तेजस शिंदे याच्या स्मृती दिनानिमित वृद्धाश्रमास मदत
कल्याण(प्रतिनिधी) विठ्ठलवाडी पूर्व येथील नवनाथ कॉलनी मध्ये राहणारा कु. तेजस राजन शिंदे (वय २६ ) याचे नऊ वर्षांपूर्वी हाजीमलंग रस्त्यावर रस्ता दुरुस्तीमध्ये दुचाकी घसरून निधन झाले होते.
त्याच्या कुटुंबीयांनी स्मृतिदिनी कोणतेही धार्मिक विधी न करता सामाजिक जाणीवेतून आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी कल्याण (पूर्व) येथील डी. एम. सी. टी. रुग्णालय व वृद्धाश्रम येथील वृद्धांकरिता फळे,मिठाई आदी वस्तूंचे वाटप करून अन्नधान्याची मदत केली.
तेजस व त्याच्या कुटुंबीयांनी तेजसने अभियंता बनावे असे स्वप्न पहिले होते. त्यात तो यशस्वी होऊन एका बिल्डरकडे कामाकरिता रुजू झाला होता. १२ फेब्रुवारी २०१७ ला रात्रीच्या वेळेस हाजीमलंग रस्त्यावरून दुचाकीने घरी परतत असताना, खड्ड्यात दुचाकी आदळून पडला व गंभीर जखमी झाला होता.
त्याला वाचवण्याकरिता कल्याण, मुलुंड व शेवटी जे.जे. रुग्णालयात त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नेले. मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाही.तेजसचे वडील राजन शिंदे, आई संगीता शिंदे व धाकटा भाऊ श्रवण यांनी धार्मिक कार्यक्रमात पैसे खर्च न करता वृद्धाश्रमाला मदत करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे गेली ८ वर्षे दरवर्षी ते मदत स्वरुपात वस्तूंचे वाटप करत आहेत. शिंदे कुटुंबियांच्या या निर्णयाचे विभागात कौतुक होत आहे.
याबद्दल तेजसचे वडील राजन व आई संगिता सांगतात कि, तेजसला सामाजिक भान होते. तो सर्वांना मदत करायचा. त्याच सामाजिक भानातून आम्ही देखील तेजसच्या स्मृतीदिनी सामाजिक कार्य करतो त्यातून आम्हांला आत्मिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुण मुलगा गमावूनही शिंदे कुटुंबीयांनी उदार मनाने आम्हास मदत करून आमची गरज भागवली अशी सामाजिक बांधिलकी सर्वांनी ठेवावी असे वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. रवींद्र जाधव यांनी यावेळेस सांगितले. याप्रसंगी तेजस ची काकी सुषमा शिंदे उपस्थित होत्या.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे
