राजकीय

जगन्नाथ शंकरशेट मार्गावरून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बेस्ट बससेवा पूर्ववत करण्याची मागणी


मुंबई-दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बेस्ट बससेवा पुन्हा जगन्नाथ शंकरशेट मार्गावरून सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) विभाग १२ चे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.

दिलीप नाईक यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेस्ट बस क्रमांक ६६, ६९, १२६, ६९ इत्यादी बस पूर्वी जगन्नाथ शंकरशेट मार्गे गिरगाव, दक्षिण मुंबईकडे जात होत्या. मात्र मेट्रो रेल्वेच्या कामामुळे गिरगाव व काळबादेवी स्थानक परिसरातील मार्ग बंद करण्यात आल्याने या बससेवा बंद करण्यात आल्या होत्या.

सन २०१७ च्या एप्रिल महिन्यापासून या बस मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून, या बसेस महर्षी कर्वे मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. त्यानंतर मेट्रोची कामे पूर्ण होऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असतानाही बससेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ गिरगावकर नागरिकांना बस पकडण्यासाठी सुमारे एक किलोमीटर पायपीट करून महर्षी कर्वे मार्गावर जावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जगन्नाथ शंकरशेट मार्गाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावरून बेस्ट बससेवा पुन्हा सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दिलीप नाईक यांनी केली आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *