लंडन ते एडिनबर्ग : एक अविस्मरणीय सफर लंडन डायरी : लेखांक पाचवा – एस. एम. देशमुख
आमचं तिकीट होतं एडिनबर्गचं… स्कॉटलंडची राजधानी असलेल्या एडिनबर्ग शहराचं. लंडनपासून एडिनबर्गचं अंतर तब्बल ६६० किलोमीटर. लंडन सोडल्यानंतर सुमारे ५२५ किलोमीटरवर स्कॉटलंडची सीमा लागते.
स्कॉटलंड हा स्वतंत्र देश असला तरी युनायटेड किंगडमचा भाग असल्यामुळे तिथे जाण्यासाठी स्वतंत्र व्हिसाची आवश्यकता नाही. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे तीन देश मिळून ग्रेट ब्रिटन तयार होते. त्यात नॉर्दर्न आयर्लंडचा समावेश झाला की त्याला युनायटेड किंगडम म्हटलं जातं.
युनायटेड किंगडमची संसद वेगळी असली तरी १९९९ पासून स्कॉटलंडची स्वतंत्र संसद अस्तित्वात आली आहे. आरोग्य, शिक्षण, शेती यांसारख्या स्थानिक विषयांवर निर्णय घेण्याचे अधिकार स्कॉटलंडच्या संसदेला आहेत. मात्र परराष्ट्र धोरण, करप्रणाली यांसारखे महत्त्वाचे विषय युनायटेड किंगडमची संसद पाहते. त्यामुळे युकेच्या व्हिसावर चारही देशांचा प्रवास करता येतो. स्वतंत्र व्हिसाची कटकट नसते. रेल्वेचं तिकीट काढायचं आणि आरामात स्कॉटलंडची सफर करायची, इतकं हे सोपं आहे.
आम्ही LNER (London North Eastern Railway) या जलदगती रेल्वेचं तिकीट काढलं होतं. ६६० किलोमीटरचं अंतर ही रेल्वे अवघ्या ४ तास ५ मिनिटांत पार करते. युकेमध्ये हायस्पीड रेल्वेची सुरुवात २००३ मध्ये झाली. फ्रान्स आणि युरोपातील देशांना जोडणारी युरोस्टार रेल्वेही याच काळात सुरू झाली. २००८-०९ नंतर युके अंतर्गत प्रवासासाठी जलदगती रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.
आपल्याकडे मात्र अजूनही बुलेट ट्रेनची चर्चा सुरूच आहे.
ताशी २०० ते २५० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करताना अचानक ग. दि. माडगूळकरांच्या बालगीताची आठवण झाली-
“झुक झुक झुक आगीनगाडी,
धुरांच्या रेघा हवेत काढी,
पळती झाडे पाहू या,
मामाच्या गावाला जाऊ या…”
काळ किती बदलला आहे, याची जाणीव या प्रवासात होत होती. रेल्वेचा वेग इतका प्रचंड होता की बाहेरची झाडं क्षणार्धात डोळ्यांसमोरून नाहीशी होत होती. साधारण १५ ते १७ सेकंदांत आम्ही एक किलोमीटर अंतर पार करत होतो.
माझी नजर मात्र सतत खिडकीबाहेरच्या निसर्गाकडे होती. बाहेर ऊन होतं, पण हिरव्यागार परिसरामुळे त्याची तीव्रता जाणवत नव्हती. गहू आणि बार्ली ही येथील प्रमुख पिकं. जुलै अखेरीस काढणीचा हंगाम सुरू होईल, असं सागर सांगत होता. काही ठिकाणी गहू अजून हिरवा होता, तर काही ठिकाणी तो सोनेरी रंगाने बहरलेला दिसत होता.
युकेमधील शेतीचं स्वरूप वेगळंच आहे. बहुतांश शेतं मोठ्या क्षेत्रफळाची आहेत. कुणाची शंभर एकर, कुणाची पाचशे तर कुणाची हजार एकरांपर्यंत शेती आहे. त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत सलग हिरवीगार शेती दिसते. शेतांच्या सीमा दर्शविणाऱ्या झुडपांच्या रांगाही अतिशय सुंदर दिसतात. मराठवाड्यात ज्याला आपण बांध म्हणतो, त्याचं हे वेगळं रूप म्हणता येईल.
काही ठिकाणी विस्तीर्ण हिरवी कुरणं दिसत होती. ही कुरणं गायी, घोडे आणि मेंढ्यांसाठी राखीव ठेवलेली होती. दूरवर चरणाऱ्या मेंढ्या आणि जनावरे रेल्वेच्या वेगामुळे छोट्या ठिपक्यांसारखी दिसत होती.
दूरवरच्या टेकड्या, टुमदार गावं, प्राचीन चर्च, वाहणाऱ्या नद्या आणि त्यावरील दगडी पूल… हे सारं दृश्य एखाद्या चित्रकाराने रंगवलेल्या चित्रासारखं भासत होतं. हा निसर्ग डोळ्यांत साठवून ठेवावा असाच होता.
प्रवासात यॉर्क हे ऐतिहासिक शहर आलं. इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेलं हे शहर जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आहे. शहराभोवतीची तटबंदी आणि त्यावरून फिरण्याचा अनुभव घेण्यासाठी लाखो पर्यटक यॉर्कला भेट देतात. मात्र आमच्या नियोजित कार्यक्रमात यॉर्क भेट नव्हती. त्यानंतर मँचेस्टरही लागलं. लहानपणापासून ऐकत आलेलं हे शहर पाहण्याची संधीही मिळाली नाही.
लंडन सोडून तीन तास झाले होते. जवळपास ५०० किलोमीटर अंतर पार झालं होतं. रेल्वे Berwick-upon-Tweed स्थानकावर पोहोचली. सागर म्हणाला, “हे इंग्लंडमधील शेवटचं रेल्वे स्थानक आहे. आता काही मिनिटांत आपण स्कॉटलंडमध्ये प्रवेश करू.”
मला इंग्लंड आणि स्कॉटलंडची सीमा पाहण्याची उत्सुकता होती. रस्त्याने प्रवास केला असता तर कदाचित ती संधी मिळाली असती. सागर आणि रूपल यापूर्वी गाडीने स्कॉटलंडला गेले होते. त्यांना “Welcome to Scotland” असे फलक पाहण्याची आणि फोटो काढण्याची संधी मिळाली होती. मात्र रेल्वे प्रवासात आम्हाला ही संधी मिळाली नाही. Berwick नंतर आपण कधी स्कॉटलंडमध्ये प्रवेश केला, हे समजलंही नाही.
मात्र निसर्गानेच आपण वेगळ्या प्रदेशात आलो आहोत, याची जाणीव करून दिली. हवेत गारवा जाणवू लागला. लंडनमध्ये ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचा अनुभव घेतल्यानंतर हा थंडगार वारा सुखावणारा होता.
आकाशात ढगांची गर्दी होती. बाहेरचा परिसर अधिक हिरवागार दिसत होता. टेकड्यांची उंची वाढत होती, कुरणं अधिक विस्तीर्ण होत होती. लहान तलाव, दगडी घरं आणि निसर्गाची वेगळी छटा स्कॉटलंडमध्ये प्रवेश झाल्याचं सांगत होती.
फर्थ ऑफ फोर्थची विस्तीर्ण खाडी, त्यावरील ऐतिहासिक पूल आणि निळाशार समुद्र पाहताना मला माझ्या आवडत्या कोकणाची आठवण झाली. खरं तर स्कॉटलंडइतकाच, किंबहुना काकणभर अधिक सुंदर आपला कोकण आहे. मात्र दुर्दैवाने आपण त्याचं सौंदर्य जगासमोर प्रभावीपणे मांडू शकलो नाही.
इथे मात्र निसर्ग जपण्याबरोबरच त्याची जगाला ओळख करून देण्याची पद्धत दिसते. प्रत्येक ठिकाणी पर्यटनाची जाणीवपूर्वक काळजी घेतलेली जाणवते.
रेल्वे पुढे धावत होती आणि माझी नजर बाहेरचा प्रत्येक क्षण टिपत होती. दाट वस्ती, वाढती वाहतूक, उंच डोंगर आणि एडिनबर्ग जवळ आल्याची चाहूल लागली.
गाडीतही हालचाल सुरू झाली होती. “Please”, “Sorry”, “Thanks” असे नम्र शब्द कानावर पडत होते. तेवढ्यात रूपल आणि सागर म्हणाले, “पप्पा, आवरा… आपल्याला उतरायचं आहे.”
एडिनबर्गच्या भव्य रेल्वे स्थानकात गाडी थांबली आणि आम्ही खाली उतरलो.
चार तासांचा हा प्रवास माझ्या आणि शोभनाच्या आयुष्यातील सर्वात सुखद प्रवासांपैकी एक होता. हा केवळ लंडन ते एडिनबर्ग असा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारा प्रवास नव्हता, तर इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या ग्रामीण जीवनाचा, हिरव्यागार निसर्गाचा, ऐतिहासिक वारशाचा आणि अनोख्या भूभागाचा अनुभव देणारी एक अविस्मरणीय सफर होती.
हे चार तास आयुष्यभर हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखे होते… हे नक्की…
(क्रमश:)

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

