पत्रकारांना धमकी प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उपनगर पत्रकार असोसिएशनचे निवेदन
मुंबई प्रतिनिधी- पत्रकारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दीना पाटील यांच्याविरोधात उपनगर पत्रकार असोसिएशनने अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी हाताला काळ्या फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले, धमक्या आणि दबावाचे प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. पत्रकारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा घटनांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
उपनगर पत्रकार असोसिएशनच्या वतीने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी अप्पर पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली.
यावेळी उपनगर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज कुलकर्णी यांच्यासह संध्या श्रीवास्तव, आनंद श्रीवास्तव, संजय गिरी, राज पांडे, प्रविण मागाडे तसेच असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने पत्रकारांवरील कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीचा निषेध करत पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची मागणी केली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

