नामदेवराव व्हटकर यांच्या ऐतिहासिक कार्यावर कृतज्ञ -हर सवाल का जवाब – बाबासाहब..!
मुंबई-(प्रातिनिधी, किशोर सूर्यवंशी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त दि.३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘ हर सवाल का जवाब – बाबासाहब ‘ या संगीतमय कार्यक्रमाद्वारे आदरांजली अर्पित करण्याचा कार्यक्रम दादर माटुंगा कल्चरल हॉल येथे पार पडला.
दर वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील भारतीयांकडून आपल्या महामानवाच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमातून श्रद्धांजली अर्पित करण्यात येते. ‘ हर सवाल का जवाब – बाबासाहब ‘ या उपक्रमाद्वारे मागील चार पाच वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय कार्यक्रमातून आदरंजली वाहण्यात येते. कार्यक्रमात येणाऱ्या अनुयायांकारिता दरवर्षी काही तरी नावीन्य प्रयोगाचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जातो.
या वर्षी हर सवाल का जवाब-बाबासाहब या कार्यक्रमात नवे प्रयोग करण्यात आले. शाब्दिक माला गुंफत ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे आणि ज्योती बडेकर यांनी सूत्रसंचालनाचा भार उचलत कार्यक्रमाची सुरुवात मंजुषा गोवर्धन यांनी भगवान बुध्दांचा रतनसूत पठनाणे केली. तसेच गायक गजेंद्र, बाळासाहेब उमप, अनहद आणि गायिका अदिती सातपुते यांच्या भीमगीताने कार्यक्रमात जोश भरला.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी नृत्य, कला सादर करत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्रोही कवी संदेश कर्डक यांनी उपस्तितांमध्ये विद्रोहाची चेतना फुंकरली आणि सुनंदाताई, छायाताई यांच्या कविता सादरिकारणामुळे सारे सभागृह शांत आणि गंभीर झाले होते. योगेश घाडे, सचिन तांबे आणि सचिन यांनी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारल्यामुळे उपस्थितांच्या पापण्या स्थिरावले. विरार ग्रुपने केलेल्या सादरीकरणामुळे सारा सभागृह टाळ्यांच्या कडकडातीने गजबजला होता. तसेच उपस्थितांनी विरार ग्रुपचे तोंडभर कौतुक केले.
अभिनेता, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी जातीय भेदभावावर सादर केलेले काव्यनाट्य व्यवस्थेला अंतर्मुख होण्यासाठी भाग पडणारे ठरले. सभागृहाच्या खाली महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे 3D चित्र लोकांच्या नयनबिंदूचे केंद्र ठरले. कोण व्हिडीओ तर कोणी फोटो काढत आपल्या आठवणीत हे चित्र कैद करण्याचा प्रयत्न करत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनाचे चित्रीकरण करण्याकरिता आपले घर, प्रिंटिंग प्रेस विकून बाबासाहेबांच्या महपरिनिर्वाणाचे अंतिम क्षण जगासमोर आणणारे ‘ मा.आमदार नामदेवराव व्हटकर ‘ यांच्या ऐतिहासिक कार्याची दखल घेत ‘ हर सवाल का जवाब – बाबासाहेब ‘च्या सर्व टिमच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते व्हटकर कुटुंबियांना ‘ कृतज्ञता सन्मान ‘ देण्यात आला. यावेळी नामदेवराव व्हटकर कुटुंबीयांनी संयोजकांकडून देण्यात आलेल्या सन्मानपत्राचा मनपूर्वक स्विकार केला. कार्यक्रमात त्रिभुवन यांनी सखोल परिचय दिल्यामुळे नव्या पिढीला नामदेवराव व्हटकर यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती मिळाली.
ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी माता रमाई व माईसाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाची थोडक्यात मांडणी केली. प्रख्यात विचारवंत, कवी डॉ.यशवंत मनोहर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कवितेत साक्षात ‘माईसाहेब आंबेडकर’ यांना बोलतं केले. त्यांच्या सादरीकरणामुळे साक्षात माईसाहेब आपल्यासोबत बोलतात की काय? असाच भास जणू लोकांना झाला. डॉ.यशवंत मनोहर यांनी गंभीरपणे मांडलेल्या माईसाहेबांमुळे बहुतेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.
मा.आमदार बाबुराव माने, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, विजय सुरवाडे, कॉम्रेड सुभोध मोरे, कामगार नेते सिताराम लव्हांडे, पत्रकार जयवंत हिरे, काशिनाथ निकाळजे, सुमेध जाधव, तेजवील पवार, विलास मोतीराम आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी कार्यासाठी संयोजक रवी भिलाने, संजय शिंदे, ज्योती बडेकर, लोकशाहीर संदेश, भानुदास धुरी,राजू शिरधनकर,प्रशांत राणे,प्रकाश, कांबळे,पोपट सातपुते इत्यादीने मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता अभीनेत्री दीपाली बडेकर यांनी गायलेल्या ‘ हर सवाल का जवाब – बाबासाहेब ‘ या शीर्षकीय गाण्याने केली. रवी भिलाने आणि संयोजकाने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

