माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची घसरण चिंताजनक-एस. एम. देशमुख
मुंबई-जागतिक स्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स अहवालात भारताची माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत पुन्हा घसरण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी भारताचा क्रमांक १५१ वा होता, मात्र नव्या अहवालात भारत १५७ व्या स्थानावर घसरला आहे. जगातील १८० देशांच्या यादीत भारताची ही घसरण लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख आणि मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी माध्यम स्वातंत्र्याच्या स्थितीचा अभ्यास करून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात माध्यम स्वातंत्र्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करणे आणि आर्थिक दबाव या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
सन २००२ मध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स सुरू झाला तेव्हा भारत ८० व्या स्थानावर होता. गेल्या २५ वर्षांत भारत थेट १५७ व्या स्थानावर पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः २०१४ नंतर घसरण अधिक वेगाने झाली. २०१४ मध्ये भारत १४० व्या स्थानावर गेला होता, तर २०२४ मध्ये भारत १५९ व्या स्थानावर पोहोचला होता. २०२५ मध्ये काहीशी सुधारणा होऊन भारत १५१ व्या क्रमांकावर आला, मात्र यावर्षी पुन्हा घसरण झाली आहे.
अहवालानुसार भारतातील परिस्थिती “व्हेरी सिरियस” या श्रेणीत मोडत आहे. शेजारी देशांच्या तुलनेतही भारत मागे पडलेला दिसतो. पाकिस्तान १५३ व्या, बांगलादेश १५२ व्या, भूतान १५० व्या तर नेपाळ ८७ व्या स्थानावर आहे.
एस. एम. देशमुख यांनी सांगितले की, पत्रकारांवरील हल्ले हा फक्त एक भाग आहे. माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी बदनामीचे दावे, देशद्रोह, आयटी कायद्यांतर्गत गुन्हे तसेच खंडणीसारख्या प्रकरणांचा वापर वाढला आहे. माध्यमांचे स्वामित्व मोठ्या उद्योगपती आणि राजकीय नेत्यांकडे गेल्याने तटस्थ व निर्भीड पत्रकारिता धोक्यात आली आहे.
अहवालातील आकडेवारीनुसार २०२५ मध्ये भारतात ९ पत्रकारांची हत्या झाली, तर ४० पत्रकारांवर हल्ले झाले. मात्र महाराष्ट्रातच ४० हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाल्याची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशमुख यांनी पुढे म्हटले की, लोकशाहीत माध्यम स्वातंत्र्य हा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. ही स्थिती लोकशाहीसाठी धोकादायक असून सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
माध्यमांवरील आर्थिक दबाव, डिजिटल प्लॅटफॉर्मवरील नियंत्रण तसेच पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने देशातील माध्यम स्वातंत्र्याचे चित्र चिंताजनक बनले असल्याचे मत ही एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

