चेंबूर पुनर्विकास दुर्घटना-जखमी मजुरांच्या पार्श्वभूमीवर सर्व बांधकाम प्रकल्पांची तातडीने सुरक्षा तपासणीची मागणी
मुंबई(प्रतिनिधी)-चेंबूर येथील सुभाष नगर, एन. जी. आचार्य मार्ग परिसरात सुरू असलेल्या एका पुनर्विकास प्रकल्पात बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत मजूर जखमी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुनर्विकास प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सदर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बांधकाम व पुनर्विकास प्रकल्पांची तातडीने सुरक्षा तपासणी करण्यात यावी, अशी मागणी चेंबूर प्रभाग क्रमांक १५२ च्या भाजप नगरसेविका आशा मराठे यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश द्यावेत. तसेच संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडून सुरक्षा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कामगार सुरक्षेबाबत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित विकसक व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी एकसमान सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे बांधकाम मजूर आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच संबंधित विकसकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही मागणी करण्यात आली आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

