ताज्या घडामोडीशहर

रणधीर विहार एसआरए सोसायटीत प्रशासकाचा अनागोंदी कारभार-निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप


सभासदांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व सहकार आयुक्तांकडे तक्रार-संबंधित अधिकाऱ्यांवर दुर्लक्षाचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) भांडुप पश्चिम येथील रणधीर विहार एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथे सन २०२४ पासून प्रशासकांचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा सभासदांनी केला आहे.

संस्थेच्या माजी व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळात प्रशासकीय व आर्थिक अनियमितता झाल्याच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक उपनिबंधक, सहकारी संस्था (एसआरए) यांनी दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पासून समिती बरखास्त करून आनंदा पाटील (बदलापूर, ठाणे) यांची प्राधिकृत अधिकारी/प्रशासक म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यांनी नियुक्तीनंतर सुमारे ७० दिवस उशिरा कार्यभार स्वीकारल्याचा आरोप आहे. तसेच कार्यभार स्वीकारल्यानंतरही ते कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार सभासदांनी केली आहे.

सभासदांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकांनी ऑडिटर पॅनलवरील प्रमाणित लेखापरीक्षकाची नियुक्ती सभासदांना कोणतीही माहिती न देता केली. तसेच २०२४ व २०२५ या कालावधीत आवश्यक असलेल्या विशेष सर्वसाधारण सभा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नाही. संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षणही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य (पुणे), विभागीय सहनिबंधक, मुंबई विभाग तसेच सहाय्यक उपनिबंधक/उपनिबंधक (एसआरए), बांद्रा यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसल्याचा आरोप संस्थेचे ज्येष्ठ सभासद बाळकृष्ण दत्ताराम तावडे यांनी केला.

तसेच प्रशासक आनंदा पाटील यांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुंबई विभागातील रहिवासी नसल्याने अपात्र ठरविले होते. त्यानंतर चेंबूर येथील पत्त्यावर करारनामा सादर करून पात्रता मिळविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे सभासदांचे म्हणणे आहे.

संस्थेचे विशेष लेखापरीक्षण सुरू असताना प्रशासकांनी अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने गणेश कदम यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचा आरोप आहे. निवडणूक अधिकाऱ्याने प्राथमिक (प्रोव्हिजनल) मतदार यादी प्रसिद्ध न करता थेट अंतिम मतदार यादी जाहीर केल्यामुळे सभासदांना हरकती नोंदविण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ मधील नियम ६ ते ११ तसेच इतर नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर आर्थिक अनियमिततेचे आरोप निष्पन्न झाल्याचे सांगितले जात असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यास राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचा इशाराही संस्थेचे ज्येष्ठ रहिवासी बाळकृष्ण तावडे यांनी दिला आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *