बिहार भवन बांधू देणार नाही- अशोक कांबळे
महाबोधी विहार प्रकरणावरून भीम आर्मी आक्रमक
मुंबई-(प्रतिनिधी) बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनादरम्यान बौद्ध धम्मगुरूंवर झालेल्या लाठीचार्ज आणि अटक आणि कारवाईचा तीव्र निषेध होत आहे.
या पार्श्वभूमीवर भीम आर्मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक कांबळे यांनी महाराष्ट्रात बिहार भवन उभारण्यास तीव्र विरोध दर्शवित आक्रमक भूमिका घेतली आहे.
कांबळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत बिहार सरकार महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात बिहार भवन उभारण्यास भीम आर्मीचा कडाडून विरोध राहील असे भिम आर्मीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बिहार सरकारकडून अनेक वर्षांपासून या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्षूंवर अमानुष लाठीचार्ज करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले, ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेचा निषेध देशभरातील बौद्ध संघटना, बौद्ध राष्ट्रे आणि अनुयायांकडून व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र सरकारला थेट इशारा देताना अशोक कांबळे म्हणाले की, हिटलरवादी भूमिका घेऊन जर महाराष्ट्रात बिहार भवन बांधण्याचा प्रयत्न झाला, तर ते कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाही.
तसेच जर जबरदस्तीने उभारणी करण्यात आली, तर त्या ठिकाणी पंचशील ध्वज आणि निळा झेंडा फडकावून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अशोक कांबळे यांनी दिला आहे.
महाबोधी विहार हा बौद्धांचा पवित्र वारसा असून, त्यावर बौद्धांचा हक्क अबाधित ठेवावा, हीच देशभरातील बौद्ध समाजाची भावना असल्याचे अशोक कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

