राजकीयशहर

धारावीत काँग्रेसला मोठा धक्का-निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश


धारावीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा काँग्रेसला रामराम

मुंबई-(प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच धारावी परिसरात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या पदाचा त्याग करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

धारावीतील हे सर्व कार्यकर्ते मुंबई काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, सातत्याने निष्ठा राखूनही स्थानिक कार्यकर्त्यांना संधी न दिल्याची भावना त्यांच्या मनात होती. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी आपल्या बहिणीला उमेदवारी दिल्यापासूनच पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही अनेकांनी पक्षशिस्त पाळत त्यांना साथ दिली होती.

आता महापालिका निवडणुकीत आता नाही तर कधीच नाही या भावनेतून इच्छुक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने विविध उपक्रम राबवले. मात्र तरीही उमेदवारी नाकारल्याने धारावीतील या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. आपल्याला भविष्यातही संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने वार्ड अध्यक्षांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवलिंग व्हटकर, विनायक पोळ, महेश तावरे, विकी व्हटकर, सुरेश मोगल आदींनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला.

या सामूहिक पक्षांतरामुळे धारावीत वर्षा गायकवाड यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान मिळाले असून, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागेल यात शंका नाही.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *