चेंबूरच्या लालडोंगर येथील एस.आर.ए. सोसायटीतील पाणीपुरवठा पुन्हा सुरू-वाचमनवरील हल्ल्यानंतर निर्माण झालेला वाद सामंजस्याने मिटला
मुंबई (प्रतिनिधी)-चेंबूर येथील लालडोंगर परिसरातील अल्टा विस्टा एस.आर.ए. सोसायटीत वाचमनवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर सामंजस्याने मिटला असून, सोमवार सायंकाळपासून सोसायटीतील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळासाठी सोसायटीतील सुमारे ७५० कुटुंबे पाण्याविना राहिली होती.
सोसायटीतील एका रहिवाशाकडून वाचमनवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ सुरक्षारक्षकांनी पाणीपुरवठा बंद केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे महिला, वृद्ध, लहान मुले तसेच आजारी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण सोसायटीला पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची तीव्र प्रतिक्रिया रहिवाशांतून उमटली होती.
दरम्यान, या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सामूहिक शिक्षेसारखा पाणीपुरवठा बंद ठेवणे अमानवी व बेकायदेशीर असल्याचा आरोप करत रहिवाशांनी सोसायटी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. समाजमाध्यमांवरही या घटनेचे पडसाद उमटले होते.
अखेर सोसायटीतील रहिवाशी, सुरक्षारक्षक आणि सोसायटीचे पदाधिकारी यांनी एकत्र येत चर्चेअंती हा वाद सामंजस्याने मिटवला. गैरसमज दूर करत परस्पर समजुतीने प्रश्न सोडवण्यात आला असून, सायंकाळपासून इमारतीतील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आल्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त करुन सोसायटी पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

