शहर

धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय


मुंबई (संतोष शिंदे)-धारावी कोळीवाडा परिसराच्या बाह्य सीमांकनाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. धारावी कोळीवाडा जमात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेतली.

बुधवार दि. ८ एप्रिल २०२६ रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत धारावी कोळीवाडा परिसराच्या बाह्य सीमांकन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीदरम्यान २०१८ साली करण्यात आलेल्या धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी एक विशेष समिती गठीत करून त्या सीमांकनावर तोडगा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

या प्रसंगी धारावी कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉमणीक किणी, सचिव दिगंबर कोळी, नगरसेवक जोसेफ कोळी, कायदे सल्लागार अ‍ॅड. वेदांत काटकर आणि सभासद राजेंद्र कोळी यांची आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत धारावी कोळीवाडा परिसरातील रहिवाशांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. समितीमार्फत सीमांकनाच्या प्रश्नावर अभ्यास करून अंतिम तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *