चेंबूर प्रभाग १५५ मधील नागरी समस्यांवर संयुक्त बैठक- विविध विकासकामांना गती देण्याचे सहाय्यक आयुक्तांचे आदेश
मुंबई-(संतोष शिंदे) चेंबूर येथील पालिकेच्या प्रभाग क्रमांक १५५ मधील विविध नागरी समस्या व प्रलंबित विकासकामांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून तसेच खासदार प्रतिनिधी रुपेश मढवी यांच्या प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेचे एम पश्चिमचे सहाय्यक आयुक्त शंकर भोसले यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला चेंबूर विधानसभेचे माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हात्रे, निरीक्षक चारुदत्त कोळी, शाखाप्रमुख अशोक वीर, विधानसभा संघटक विनयना सावंत, महिला शाखा संघटक मनीषा मोकल यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रभाग क्रमांक १५५ मधील कै. दामोदर शेरमकर मार्गावरील रस्ते व गटार कामे, रस्त्यालगत टाकण्यात येणारी ३०० एमएम पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, अल्टाविस्टा इमारतीचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न, सिवरेज लाईन जोडणी, साईनगर ते वैभव सोसायटी व आनंद नगर शाळा परिसरातील रस्ते व गटार कामे, साईनगर ते सुमन नगर कल्व्हर्ट येथील गटार काम, श्रमिक सोसायटी, अमेय सोसायटी व बाळासाहेब दंडवते इमारतीजवळील टी-जंक्शन रस्त्याचे काम, चिखलवाडीतील गटार, कचराकुंडीचे नियोजन आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यासोबतच सुमन नगर ते शिवसृष्टी दरम्यान नव्या पदचारी पुलाचे काम, आरसीएफ कंपनीतील नाल्याची सुधारणा, विभागातील हायमास्ट लाईट, सार्वजनिक शौचालये, माहुलगावातील सिवरेज लाईन व रस्ते, शिवशक्ती नगर येथील रस्ते, जिजामाता नगर नाल्याची साफसफाई, आरसी मार्ग फ्रीवेखाली सौंदर्यीकरण, तसेच माहुल गावातील पंपिंग स्टेशन व पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
या सर्व विकासकामांची अंमलबजावणी ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश सहाय्यक आयुक्त शंकर भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीनंतर उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सहकार्याबद्दल व सकारात्मक भूमिकेसाठी सहाय्यक आयुक्तांचे आभार मानले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

