ताज्या घडामोडी

डिजिटल क्रांतीच्या वळणावर मराठी पत्रकारितेचा नवा चेहरा,मुंबई-ठाण्यातील पत्रकारांचा विशेष नियुक्ती सोहळा


विशेष प्रतिनिधी-आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात डिजिटल माध्यमांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, माहितीच्या तत्पर प्रसारासाठी ही माध्यमे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच डिजिटल क्रांतीचा विचार करून आणि डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद’ व ‘डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र राज्य’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी एका विशेष नियुक्ती सोहळ्याचे व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सायं. ४:०० ते ६:०० या वेळेत मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या मजल्यावर संपन्न होणार आहे.​या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मुंबई व ठाणे कमिटीच्या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

डिजिटल पत्रकारितेतील नवनवीन प्रवाह, माध्यमांची वाढती जबाबदारी आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य या विषयांवर नवनियुक्त पत्रकारांना यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

​या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीकर, डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल वाघमारे, मुंबई विभागीय सचिव दीपक केतके आणि विभागीय उपाध्यक्ष विशाल परदेशी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मुंबई कमिटीचे अध्यक्ष राजा आदाटे , विभागीय सह-सचिव दीपक पवार, उपाध्यक्ष विनायक सानप आणि कोषाध्यक्ष पांडुरंग म्हस्के विशेष परिश्रम घेत आहेत.

​कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक आणि दर्पणकार यांच्या प्रतिमेचे पूजन करून होईल. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, मुंबई व ठाणे कमिटीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र वाटप, नवनियुक्त सदस्यांना मार्गदर्शन, आभार प्रदर्शन आणि शेवटी चहापानासह या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *