गुन्हेसामाजिक

धगधगती मुंबईचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, २८ फेब्रुवारीला नवी मुंबईत होणार वितरण


ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवनगौरव पुरस्कार

विजय पाटकर, योगेश चिकटगावकर, अनुजा दांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

मुंबई-धगधगती मुंबई या साप्ताहिक वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शनि दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नवी मुंबईतील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरखैरणे येथे करण्यात आले आहे. नवप्रेरणा कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळाही याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

गेल्या सोळा वर्षांपासून धगधगती मुंबई हे वृत्तपत्र जनतेच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढणारे माध्यम म्हणून कार्यरत आहे. मुद्रित आवृत्तीबरोबरच यूट्यूब चॅनल व ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण करत सर्वसामान्यांचा आवाज म्हणून या माध्यमाने विशेष स्थान मिळवले आहे.
वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव कार्य करण्याचा प्रयत्न सदर वृतपत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागातून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवून देणे, उपचारादरम्यान आवश्यक रुग्णालयीन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अनाथाश्रम व वृद्धाश्रमांमध्ये दरवर्षी अन्नदान व वस्त्रदानाचे कार्यक्रम राबविणे अशी विविध सामाजिक उपक्रम देखील सुरू आहेत.

वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच हे कार्य शक्य होत असल्याचे आयोजकांनी विशेष करुन नमूद केले आहे.दरम्यान धगधगती मुंबई २०२६ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

सामाजिक सेवेबद्दल समाजरत्न पुरस्कार धारावीचे समाजसेवक रमेश कदम, समाजभूषण पुरस्कार उन्नतीचे चेअरमन हनुमंत रांजणे आणि कोपरखैरणे येथील समाजसेवक वसंत जाधव (सर) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

शैक्षणिक रत्न पुरस्कार प्रताप महाडिक, साहित्यरत्न पुरस्कार डॉ. शांताराम कारंडे, युवा राजकीय रत्न पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेवक गणेश सकपाळ (घणसोली), उद्योगरत्न पुरस्कार सौ.अनुजा कौतिक दांडगे (महाराष्ट्र बाजार पेठ) तसेच उद्योजक के. के. शेलार यांना जाहीर झाला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल नवी मुंबईतील प्रसिद्ध हाडवैद्य डॉ. सचिन वरखडे आणि एमबीबीएस डॉ. सुरज प्रकाश पाटील यांना वैद्यकीय रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कलाक्षेत्रातील कार्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना कलारत्न पुरस्कार तर लोककलावंत योगेश चिकटगावकर यांना कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

कायद्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवी मुंबईतील अ‍ॅड. मनीषा योगेश चव्हाण यांना कायद्यारत्न पुरस्कार, सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांना सहकारत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच दलित मित्र पुरस्कार मुंब्रा-ठाणे येथील ज्येष्ठ नगरसेवक राजन नारायण कीने, आध्यात्मिक रत्न विजयकुमार स्वामी आणि क्रीडा रत्न पुरस्कार किशोर येवले यांना जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट संस्था म्हणून सुका व ओला कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापनाबाबत समाजप्रबोधन करणाऱ्या संगम प्रतिष्ठान या संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच नवरात्री उत्सव काळात डी डी एम न्यूजच्या माध्यमातून पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *