चर्मकार समाजातील ६० विद्यार्थ्यांना संगणक मार्गदर्शन व शैक्षणिक किट वाटप
मुंबई(प्रतिनिधी)-राष्ट्रीय चर्मकार संघ, धारावी तालुक्याच्या वतीने व हराळे सेवा संघाच्या सहकार्याने धारावीतील चर्मकार समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसह पालकांसाठी संगणक माहिती परिचय व शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला. सकीना बाई चाळ, हनुमान मंदिर सभागृह येथे झालेल्या या उपक्रमात सुमारे ६० विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार संघाचे धारावी तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर व हराळे सेवा संघाचे अध्यक्ष शंकर बळी यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी नरेंद्र छाया संगणक इन्स्टिट्यूटचे संचालक नागेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे महत्त्व सांगत एमएस ऑफिस, डीटीपी, टॅली, हार्डवेअर, अकाउंट्स व टायपिंग आदी अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देत भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान नरेंद्र छाया संगणक इन्स्टिट्यूटतर्फे उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रणाली शिंदे, आरती यादव, किशोर जाधव, सुशील यादव व संगीता शेवाळे यांनी भेटवस्तू वाटप व माहितीपत्रक वितरणासाठी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला प्रतिनिधी आरती राजू माने व संगीता तुळशीराम पवार यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी तालुकाध्यक्ष दिलीप गाडेकर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.तर शंकर बळी यांनी नरेंद्रछाया संगणक इन्स्टिट्यूटचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पल्लवी कदम व नेहा शिखरे यांचे विशेष सहकार्य लाभले. महिला प्रतिनिधी आरती राजू माने यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाबद्दल दिलीप गाडेकर यांनी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त केले. शेवटी विद्यार्थी व पालकांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

