ताज्या घडामोडी

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर पुरस्कारांचे २२ फेब्रुवारी रोजी रायगड कर्जत येथे वितरण


मुंबई-(प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण तसेच राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कर्जत येथील रॉयल गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिली.

ग्रामीण महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ उत्कृष्ट पत्रकारितेबरोबरच समाजासाठी विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या कार्याचा राज्य पातळीवर सन्मान व कौतुक व्हावे, यासाठी प्रत्येक महसूल विभागातून एका तालुका पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी विशेष बाब म्हणून विदर्भातून दोन तालुका पत्रकार संघांना हा पुरस्कार दिला जात असून, मुंबई विभागातूनही एका पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी पुरस्कार वितरण सोहळे नागपूर, पाटण, अक्कलकोट, गंगाखेड, नगर जिल्ह्यातील कर्जत, माहूर, सेलू, वडवणी, पालघर आदी ठिकाणी पार पडले आहेत. यंदा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून, परिषदेचे हे पुरस्कार राज्यात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात.

२०२५ च्या पुरस्कारांचे मानकरी
पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा परभणी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर झाला आहे.
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे –
नागपूर विभाग – बेला तालुका पत्रकार संघ, जिल्हा नागपूर
नागपूर विभाग – चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जिल्हा गडचिरोली
नाशिक विभाग – नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ, जिल्हा नाशिक
कोंकण विभाग – पनवेल महानगर प्रेस क्लब, जिल्हा रायगड
पुणे विभाग – आंबेगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा पुणे
लातूर विभाग – किनवट तालुका पत्रकार संघ, जिल्हा नांदेड
संभाजीनगर विभाग – अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड
अमरावती विभाग – संग्रामपूर तालुका पत्रकार संघ, जिल्हा बुलढाणा
कोल्हापूर विभाग – पलूस तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा सांगली
मुंबई विभाग – उपनगर पत्रकार असोसिएशन
या पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मोहिते, दर्वेश पालकर आदींनी केले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *