गुन्हेशहर

धारावी सेक्टर ५ पुनर्विकासात रहिवाशांच्या संघर्षाला यश-परिशिष्ट–२ ची पहिली यादी जाहीर


लढा संघर्षाचा, विजय एकजुटीचा

स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई-(संतोष शिंदे)–धारावीतील काळा किल्ला सेक्टर क्र. ५ पुनर्विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर निर्णायक यश मिळाले आहे. धारावी सेक्टर ५ पुनर्विकास कृती समितीच्या नेतृत्वाखाली माटुंगा येथील (DRP) धारावी पुनर्विकास प्रकल्प कार्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चाच्या दणक्यानंतर डी आर पी च्या वतीने पुनर्वसन करण्यात येणाऱ्या रहिवाशांची परिशिष्ट–२ ची पहिली यादी जाहीर झाल्याने धारावी काळा किल्ला परिसरातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर ५ मध्ये म्हाडाने उभारलेल्या नवीन इमारतींमध्ये संग्राम नगर, शिवगंगा रहिवासी संघ, रेवा फोर्ट कॉलनी, क्रांतीनगर , सीताबाई टिकेकर चाळ, काजरोळकर चाळ, काळा किल्ला तसेच आसपासच्या परिसरातील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संतप्त रहिवाशांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या म्हाडा वांद्रे येथील कार्यालयावर धारावी सेक्टर ५ पुनर्विकास कृती समितीचे प्रमुख गणेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला होता. या मोर्चात धारावी काळा किल्ला परिसरातील शेकडो रहिवाशी सहभागी झाले होते.

या मोर्चादरम्यान कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने डी आर पी प्रकल्पातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते.

कृती समितीने प्रशासनाकडे लक्ष वेधत सांगितले की, जे क्लस्टरमधील शताब्दी नगर परिसरातील पुनर्वसन अद्याप अपूर्ण आहे. जे क्लस्टरमधील झोपड्यांचे स्थलांतर झाल्यानंतर ओ व एन क्लस्टरमधील झोपड्यांचे पुनर्वसनही अद्याप रखडलेले आहे. या विलंबामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून, पुनर्विकास प्राधिकरणाने पुनर्वसनासाठी निश्चित कालावधी जाहीर करावा, अशी ठाम मागणी त्यावेळी करण्यात आली होती.

स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता कोणतेही निर्णय घेतले जाऊ नयेत, अशी भूमिका मांडण्यात आली असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.

एकूणच, धारावी सेक्टर ५ मधील रहिवाशांच्या संघटित संघर्षामुळे येथील रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाली असून, एकजुटीच्या बळावर प्रशासनालाही निर्णय घेण्यास भाग पाडता येते याचे हे एक ठळक उदाहरण ठरले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *