अल्टाविस्टा एसआरए बिल्डिंगला नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन
अल्टाविस्टा एसआरए बिल्डिंगला नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन
मुंबई- चेंबूर येथील लालडोंगर विभागातील अल्टाविस्टा एसआरए बिल्डिंग येथे मागील काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी होती. या पाणीटंचाईबाबत तक्रार प्राप्त होताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून प्रतिनिधी मंडळाने आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शंकर भोसले यांची भेट घेतली.
या भेटीत अल्टाविस्टा बिल्डिंगमधील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती करण्यात आली. त्यावर सहाय्यक आयुक्त भोसले यांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन देत आजपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये पुरवठा सुरळीत न झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची हमीही त्यांनी दिली.
या वेळी विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, शाखाप्रमुख अशोक वीर, खासदार प्रतिनिधी व उपविभाग अधिकारी रुपेश मढवी, उपशाखाप्रमुख प्रविण कोल्हटकर, नईम भाई तसेच जल विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक रहिवाशांनी या तातडीच्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले असून अल्टाविस्टा एसआरए बिल्डिंगमधील पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

