गुन्हे

पनवेलमध्ये फॉर्च्युनरमधून पिस्तूल जप्त; बनावट नंबर प्लेट वापरणारा संशयित अटकेत


मुंबई -(शिवा नाडार)-वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या फॉर्च्युनरमधून पिस्तूल आणि संशयिताचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत. बनावट वाहन क्रमांक वापरून फिरणाऱ्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मंगळवारी (दि. २) सायंकाळी सुमारे ८.३० च्या सुमारास नवीन पनवेल रेल्वे स्थानक (पूर्व) परिसरात वाहतूक निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक उपनिरीक्षक जीवन शेरखाने आणि त्यांच्या पथकाकडून वाहतूक नियमनाचे काम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.

संशयास्पद वाहन क्रमांक, मालकाने नाकारली मालकी

फॉर्च्युनर (MH 03 AH 7863) वाहन वाहतूक व्यवस्थेला अडथळा ठरत असल्याने पोलिसांनी गाडीच्या नंबरवरील मालकाशी संपर्क साधला. मात्र, वाहन क्रमांक माझा असला तरी ही कार माझी नाही. कोणीतरी माझ्या गाडीचा नंबर वापरत आहे, याबाबत मी तक्रारही दाखल केली आहे, असे सांगत मालकाने आपला संबंध नाकारला. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला आहे.

वाहनातून पिस्तूल व संशयिताचे लायसन्स सापडले

तपास दरम्यान गाडीचा समोरील दरवाजा अर्धवट उघडा आढळला. आतून पिस्तूलसदृश शस्त्र तसेच ‘राजेंद्र निकम’ नावाचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले. ‘कोर्ट चेकर’ ऍपवरील पडताळणीत संबंधित व्यक्तीविरोधात मुंबई विभागात विविध गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.

काही वेळातच राजेंद्र निकम (४८, रा. चुनाभट्टी, मुंबई) घटनास्थळी आला. त्याला वाहनासह ताब्यात घेऊन खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचकडे सोपवण्यात आले.

खरा मालक कोण? शस्त्र कुठून आले?

फॉर्च्युनरचा वास्तविक मालक कोण? डुप्लिकेट नंबर प्लेटचा नेमका हेतू काय? वाहनातून मिळालेल्या पिस्तुलाचा कोणत्या गुन्ह्यांसाठी वापर झाला? हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *