ताज्या घडामोडी

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत 14 ऑक्टोबरला विराट मोर्चा


  • महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत 14 ऑक्टोबरला विराट मोर्चा

सर्व बौद्ध-आंबेडकरी संघटना आणि नेत्यांची एकजूट

अभी नही तो कभी नही चा निर्धार

मुंबई-(संतोष शिंदे)-बुद्धगया येथील जागतिक बौद्ध श्रद्धास्थान महाबोधी महाविहार बौद्धांच्या पूर्ण ताब्यात यावे आणि 1949 चा बिहार मंदिर व्यवस्थापन कायदा (BT Act) रद्द व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील सर्व बौद्ध-आंबेडकरी संघटना, रिपब्लिकन गट आणि नेते एकत्र आले असून, येत्या 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भायखळा जिजामाता उद्यान (राणी बाग) ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

भगवान बुद्धांनी समता, विवेक आणि विज्ञानवादी विचारांचा जीवनमार्ग दिला असून अंधश्रद्धा, पुनर्जन्म, श्राद्ध यासारख्या कर्मकांडांचा विरोध केला. मात्र जिथे त्यांनी ज्ञानप्राप्ती केली त्या महाबोधी महाविहार परिसरात आजही अंधश्रद्धेची कर्मकांडे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाविहाराच्या मुक्तीसाठीचा संघर्ष निर्णायक टप्प्यात आला आहे.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या पत्रकार परिषदेत या मोर्चाची घोषणा करण्यात आली. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, नेते नाना इंदिसे, प्रा. सुरेश माने, तानसेन ननावरे, युथ रिपब्लिकनचे सागर संसारे, सुनीलभाऊ निर्भावणे, दलित पँथरचे सुरेश केदारे, शिवसेनेचे राजू वाघमारे, रवी गरुड, बाळराजे शेळके, राकेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राज्यातील बौद्ध आंबेडकरी जनतेने लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलन कृती समितीने केले आहे.

या चळवळीला बळकटी देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व रिपब्लिकन गट, बौद्ध संघटना आणि नेत्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला असून आतापर्यंत तीन संयुक्त बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व मतभेद बाजूला ठेवून बौद्ध म्हणून एकजूट दाखवण्याचे आणि आंदोलन कृती समितीच्या बॅनरखाली एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभी नाही तो कभी नही या निर्धारासह 14 ऑक्टोबरचा हा विराट मोर्चा राज्यातील बौद्ध-आंबेडकरी जनतेच्या एकजुटीचे दर्शन घडवेल आणि महाबोधी महाविहार मुक्तीसाठीच्या संघर्षाला नवी दिशा देईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त करण्यात आला आहे.

 

 


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *