देवनारमध्ये ‘तिरंगा गोविंदा पथक’च्या दहीहंडी सरावास लवकरच प्रारंभ
मुंबई (प्रतिनिधी)-आगामी दहीहंडी उत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर देवनार येथील तिरंगा गोविंदा पथकाच्या सरावाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ होणार आहे. बुधवार, दि. २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता पाटीलवाडी गार्डन, देवनार येथे साईंच्या चरणी नारळ अर्पण करून सरावाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
यावेळी सर्व बालगोपाल, गोविंदा आणि दहीहंडीप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ज्यांच्यामध्ये जिद्द, शिस्त आणि संघभावना आहे अशा तरुणांचे तिरंगा गोविंदा पथकात मनःपूर्वक स्वागत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
देवनारची परंपरा आणि दहीहंडीचा उत्साह अधिक जोमाने पुढे नेण्याच्या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले असून, यंदाही तिरंगा गोविंदा पथक आकर्षक आणि शिस्तबद्ध मानवी मनोरे रचून दहीहंडी उत्सवात विशेष छाप पाडण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.
या उपक्रमासाठी देवेंद्र लोखंडे (अध्यक्ष), रियाझ शेख (सचिव), सुरेश घोलप (खजिनदार) आणि आकाश पवार (गोविंदा प्रमुख) हे पदाधिकारी कार्यरत असून, प्रशिक्षक रत्नकांत पराडकर (मामा) व उपप्रशिक्षक आदित्य बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव पार पडणार आहे.
आयोजकांनी सर्व गोविंदांनी वेळेवर उपस्थित राहून सरावात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

