२१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सिंधुदुर्ग पोलिसांची दमदार कामगिरी- ८ पदकांची कमाई
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी-उमेश शेट्ये)-रायगड येथील अलिबाग येथे १३ ते १५ जुलै २०२६ दरम्यान आयोजित २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन करत एकूण ८ पदके पटकावली. यामध्ये ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश असून, या यशामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा ठसा पुन्हा एकदा प्रकर्षाने उमटला आहे.
मेळाव्यात पोलीस उपनिरीक्षक अविनाश चंद्रकांत पाटील यांनी लिफ्टिंग अँड पॅकिंग स्पर्धेत सुवर्णपदक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष काशीराम सावंत यांनी पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक, तर पोलीस कॉन्स्टेबल अमित आकराम राणे यांनी अँटी सबोटाज चेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद सुनील हिंगे यांनी दोन रौप्य पदके, पोलीस हवालदार राहुल शिवाजी काळे, पोलीस हवालदार निखिल विनोद चव्हाण आणि चंद्रेश्वर सुभाष मोरजकर यांनी प्रत्येकी एक रौप्य पदक, तर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शब्बीर मुल्ला यांनी पोलीस पोर्ट्रेट स्पर्धेत कांस्य पदक मिळविले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांनी सर्व विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलीस दलाने मिळविलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात आणखी भर पडल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

