वेंगुर्ल्यात ३१.५ तोळे सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी २४ तासांत उघडकीस
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वेंगुर्ला पोलिसांची संयुक्त कारवाई; विधीसंघर्षग्रस्त बालकासह साथीदार निष्पन्न
सिंधुदुर्ग प्रतिनिधी-उमेश शेट्ये
वेंगुर्ला तालुक्यातील आडारी, टेंबवाडी येथे घराचे कुलूप तोडून तब्बल ३१.५ तोळे सोन्याचे दागिने, किंमत १५ लाख ९७ हजार रुपये, चोरीला गेल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे.
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडारी, टेंबवाडी येथे फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाची कडी अज्ञात चोरट्याने लोखंडी हत्याराच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ३१.५ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे १५ लाख ९७ हजार रुपये किमतीचे, चोरून नेण्यात आले होते.
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे सुरू केला. घटनास्थळी मिळालेल्या अंगुलीमुद्रांच्या आधारे अंगुलीमुद्रा विश्लेषक सपोनि श्री. मागाडे यांनी अथक प्रयत्न करून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला. त्याला त्याच्या राहत्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या बालकाची सखोल चौकशी केली असता, त्याने हा घरफोडीचा गुन्हा आपला साथीदार उमेश प्रल्हाद पेडणेकर (वय १८ वर्षे, रा. उभादांडा, आडारी, ता. वेंगुर्ला) याच्यासोबत केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ११ तोळे सोने फिर्यादी यांच्या घरातूनच पोलिसांनी हस्तगत केले आहे. उर्वरित सोन्याच्या दागिन्यांपैकी काही सोने सोनाराला विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक लोखंडी हातोडा आणि एक लोखंडी पारई देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. उर्वरित सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार, पोलीस कॉन्स्टेबल महेश समजिस्कर, अमर कांडर, तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर, हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार, पोलीस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर, मनोज परोळकर, आकाश घाटगे आणि पंकज पाटील यांच्या पथकाचा सहभाग होता.
या कारवाईमुळे घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित चोरीच्या मुद्देमालाबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

