गुन्हे

सिंधुदुर्गात २ कोटी ३७ लाखांचे अंबरग्रीस जप्त


व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे ४ जण ताब्यात-वाहनांसह २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सिंधुदुर्ग प्रतिनिधी-उमेश शेट्ये

व्हेल माशाच्या उलटीपासून (अंबरग्रीस) तयार होणाऱ्या प्रतिबंधित पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम अंबरग्रीस, ज्याची किंमत २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये आहे, तसेच दोन वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजता कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत गस्त सुरू असताना अंबरग्रीसची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पणदूर ते कडावल मार्गावर कुलस्वामिनी एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला.

या कारवाईत संकेत संतोष चव्हाण (२६), महेश लक्ष्मण रेवणकर (३५), अमेय पुंडलिक देसाई (३१) आणि अमित अरुण अणावकर (३९) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २ किलो ३७३ ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न (MH 07 AN 5294) आणि मारुती सुझुकी एर्टिगा (MH 07 AS 3747) ही दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली.

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८ आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम आणि परीविभागीय पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *