महाराष्ट्र

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात POSH कायद्यावरील जनजागृती कार्यशाळा संपन्न


सिंधुदुर्ग-विशेष प्रतिनिधी-उमेश शेट्ये

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची प्रभावी हाताळणी, प्रतिबंध आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेत ५ पोलीस अधिकारी, ८२ पोलीस अंमलदार तसेच ८ मंत्रालयीन कर्मचारी सहभागी झाले होते .

कार्यशाळेत ॲड. रुचा लोखंडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ (POSH Act) याविषयी सविस्तर माहिती दिली. अंतर्गत तक्रार समितीची भूमिका, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, चौकशीची पद्धत तसेच महिलांचे अधिकार यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशीलतेने व कायदेशीर दृष्टीकोनातून पाहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या विधी अधिकारी ॲड. श्रीनिधी देशपांडे यांनी ही महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे (भरोसा सेल, सिंधुदुर्ग) यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक कुमारी नवज्योती सातम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल कोकरे व निरीशींगा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *