आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना लाडू वाटप
मुंबई प्रतिनिधी
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठाच्या वतीने यंदाही दि. १५ जुलै २०२६ रोजी लोणंद (जि.सातारा) येथे होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्या तेरा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमांतर्गत यावर्षीही वारकरी भाविकांना मोफत लाडू वाटप करण्यात येणार असून, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा लाडूंची संख्याही वाढविण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वाशी आणि परिसरातील सातारकर बांधव दरवर्षी लोणंद येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाकार्यात सहभागी होतात. यंदाच्या उपक्रमासाठी दोन ते तीन बसेस, चार ते पाच चारचाकी वाहने आणि शेकडो सेवाभावी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हा वाढता प्रतिसाद म्हणजे सातारकर बांधवांचा संस्थेवरील विश्वास आणि माऊलींचा आशीर्वाद असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्रतिष्ठानच्या सेवाकार्याची सुरुवात अवघ्या सात जणांनी केली होती. आज या उपक्रमाचे रूपांतर मोठ्या सामाजिक परिवारात झाले असून, अनेक सेवाभावी सदस्य या कार्याशी जोडले गेले आहेत. देणगीदार आणि वर्गणीदार स्वतः उपस्थित राहू शकत नसल्यास आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना या सेवायज्ञात सहभागी करून त्यांना वारीचा आध्यात्मिक अनुभव देण्याची परंपरा प्रतिष्ठानने जपली आहे.
प्रतिष्ठानचे दीर्घकालीन उद्दिष्ट असलेल्या ‘सातारकर भवन’ उभारणीसाठी सन २०१६ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुंबईत येणाऱ्या सातारकर बांधवांना निवास, उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरता आसरा तसेच स्पर्धा परीक्षा, पोलीस, लष्कर व इतर भरतीसाठी येणाऱ्या युवकांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी अध्यक्ष मा. नानासाहेब निकम आणि उपाध्यक्ष मा. बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू आहेत.
लाडू वाटपाबरोबरच प्रतिष्ठान वर्षभर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रम राबविते. दसरा मेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सातारकरांचा ‘सातारा रत्न”सातारा भूषण’ आणि ‘सातारा विशेष पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. तसेच सातारकर उद्योजक संघाच्या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक योजना, विवाह मंडळ, रोजगार मार्गदर्शन, रक्तदान व आपत्कालीन आरोग्य सेवा असे अनेक उपक्रमही राबविले जातात.
‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेने कार्यरत असलेले आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान हे केवळ एक संस्थात्मक व्यासपीठ नसून सातारकरांना एकत्र आणणारे सामाजिक कुटुंब बनले आहे. समाजहित, संस्कार आणि सेवाभाव जपत भविष्यातही विविध लोककल्याणकारी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

