सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाइन संगणकीय सोडत सोमवार २० जुलै २०२६ रोजी
ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ८,७५९ सदनिकांसाठी होणार सोडत; एकूण १९,५४८ अर्ज प्राप्त
मुंबई (प्रतिनिधी)-सिडकोतर्फे डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाइन संगणकीय सोडत दिनांक २० जुलै २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) प्रवर्गातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण १६,७८८ सदनिकांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी सिडकोकडे एकूण १९,५४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र. २६७०/२०२५ मधील दिनांक २३ जून २०२५ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार सदर संगणकीय सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील ८,७५९ सदनिकांसाठी घेण्यात येणार आहे. या प्रवर्गासाठी एकूण १०,३३३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
सदर सोडत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेनंतर यशस्वी अर्जदारांची यादी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
यशस्वी अर्जदारांना संबंधित सदनिकेकरिता कोणताही हक्क अथवा दावा आपोआप प्राप्त होणार नाही. सदनिकेचे अंतिम वाटप हे अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी, गृहनिर्माण योजनेतील अटी व शर्ती तसेच सिडकोच्या लागू नियमांनुसार करण्यात येणार आहे.
सोडतीचा निकाल तसेच पुढील वाटप प्रक्रियेची माहिती मिळविण्यासाठी अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

