सामाजिक

उपवर्गीकरणविरोधी आंदोलनानंतर भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल: कारवाईच्या विरोधात भिम आर्मीकडून तीव्र निषेध


मुंबई-अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात मुंबईतील आजाद मैदान येथे झालेल्या विराट मोर्च्यानंतर भीम आर्मी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांच्यावर आजाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा अशोक कांबळे यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, हा लोकशाही आणि संविधानिक हक्कांवर घाला असल्याचा आरोप केला आहे.

रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० जून २०२६ रोजी आजाद मैदान येथे अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, २५ जून २०२६ रोजी मातंग समाजाच्या वतीने आजाद मैदान येथे उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनाचा उल्लेख केला आहे. त्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर कोणतीही कारवाई झाली नसताना, शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा दुहेरी न्याय असून सामाजिक चळवळींना दडपण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमचे आंदोलन पूर्णपणे संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सुरू आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना किंवा दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधातील आमचा संघर्ष यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असा निर्धार अशोक कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी जीव गेला तरी चालेल, मात्र अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडत सरकारने आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचा सन्मान करावा, अशी मागणी अशोक कांबळे यांनी राज्य सरकारला केली आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *