डी आर पी विरोधात धारावीतील कोळी बांधव तीव्र आंदोलन छेडणार
धारावी पुनर्विकासाच्या आडून धारावी कोळीवाड्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न
मुंबई-(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाने भूमि अभिलेख विभागाच्या वतीने २०१८ साली केलेले धारावी कोळीवाड्याचे बाह्य सिमांकन अजूनही पूर्ण केले नाही.त्याच प्रमाणे धारावी पुनर्वसन प्रकल्पातून धारावी कोळीवाडा वगळण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पात धारावीतील कोळीवाड्याचे क्षेत्रफळ चुकीचे दाखवले आहे. त्याला धारावी कोळी जमात ट्रस्टने तीव्र विरोध दर्शविला आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी धारावी कोळी जमात आणि धारावी कोळीवाड्याच्या हितासाठी कार्य करणाऱ्या धारावी कोळी जमात ट्रस्ट तर्फे होळी मैदान येथे नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत धारावी कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉमणिक किणी, सचिव दिगंबर कोळी, सदस्य जोसेफ कोळी, श्रीमती देवयानी कोळी तसेच इतर पदाधिकारी आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हाडा च्या वतीने १९९० साली भुमिपुत्रांना खोटी आश्वासने देऊन कोळी समाजाच्या मासे सुकविण्याच्या व वहिवाटेच्या जागेत इमारती बांधल्या व कोळी समाजाला वंचित ठेवले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एन एम डी पी एल हे धारावी कोळीवाड्याची जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप धारावी कोळी जमात ट्रस्ट ने केला असून त्याबद्दल धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी देखील कोळी बांधवांनी केली आहे.
कोळी समाज मुळ मुंबईकर, भुमिपुत्र आहे. धारावी कोळीवाड्याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे.धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाने धारावी कोळीवाड्याच्या वहीवाटेच्या व पारंपारीक सण उत्सवाच्या जागा हडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अदानी धार्जिन्या प्रशासनाचा निषेध करीत या विरोधात धारावीतील कोळी बांधवानीं तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा दिला आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे
