श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक २४ चे मुंबईतून पंढरपूरकडे प्रस्थान
मुंबई- वटपौर्णिमेच्या पवित्र शुभमुहूर्तावर श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक २४ चे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले. दिंडी प्रमुख ह.भ.प. नारायण महाराज पाटील, दिंडी चालक वारकरी भूषण चंद्रकांत कारंडे महाराज, शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजारामबुवा शेलार यांच्यासह हजारो वारकरी भाविक या पायी दिंडी सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.
मुंबईतून पंढरपूरकडे प्रस्थान करणारी ही पहिली दिंडी असल्याने दरवर्षी मुंबई व परिसरातील हरी भक्त मोठ्या संख्येने वारी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभागी होतात.
मुंबईहून सुरू झालेला हा पायी दिंडी यात्रेचा प्रवास सलग ११ दिवसांत आळंदी येथे मोठ्या उत्साह आणि भक्ती भावात पोहोचतो. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक २४ पुढील १८ दिवसांचा प्रवास करून पंढरपूर गाठते.
अशा प्रकारे तब्बल २९ दिवसांची ही अखंड पायी दिंडी भक्तिभाव, नामस्मरण आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम ठरते. या दिंडीत दरवर्षी ठीक ठिकाणचे हजारो वारकरी विठू नामाचा गजर करीत मोठ्या भक्ती भावात या पायी दिंडीत उत्साहाने सहभागी होतात.
श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक २४ ची स्थापना १९७८ मध्ये संस्थापक वैकुंठवासी ह.भ.प. पांडुरंग कारंडे कराडकर महाराज यांनी केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी आणि वारकाऱ्यांनी ही परंपरा अखंडपणे सुरु ठेवली आहे.
यंदा या पायी दिंडीचे ४९ वे वर्ष असून, पुढील वर्षी होणारा सुवर्णमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्याचा मानस असल्याची माहिती डॉ. शांताराम कारंडे यांनी यावेळी दिली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

