धार्मिक

आषाढी एकादशीनिमित्त मुंबईकरांना मुबलक तुळशी रोपे उपलब्ध करून देण्याची मागणी


संतोष शिंदे, मुंबई

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना मुबलक प्रमाणात तुळशीची रोपे उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ चे विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील जनतेचा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव असून या दिवशी घराघरांत श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा तसेच तुळशी पूजनाला विशेष महत्त्व असते. या निमित्ताने तुळशीची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते.

पूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या जिजामाता उद्यानातून नागरिकांना नाममात्र शुल्कात तुळशीची रोपे उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तुळशीच्या रोपांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिलीप नाईक यांनी निवेदनात नमूद केले आहे.

महानगरपालिकेच्या विविध नर्सरींमध्ये तुळशीची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात रोपे मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी केवळ ५० ते १०० रोपेच उपलब्ध होत असल्याने मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाच्या आषाढी एकादशीपूर्वी जिजामाता उद्यानासह महानगरपालिकेच्या सर्व उद्यान व नर्सरींमध्ये तुळशीच्या रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात यावी, तसेच नागरिकांना सहज उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. रोपांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात आवश्यक असल्यास किरकोळ वाढ केली तरी नागरिक ती आनंदाने स्वीकारतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला याबाबत आवश्यक निर्देश देऊन नागरिकांच्या धार्मिक भावना आणि गरजांचा विचार करावा, अशी विनंतीही दिलीप नाईक यांनी उपमहापौरांकडे केली आहे. या मागणीमुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईकरांना तुळशीची रोपे सहज उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *