तब्बल १४ वर्षे रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्पाचा मार्ग मोकळा–चेंबूर एम-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांच्या पाठपूरवठ्याला यश
मुंबई-(संतोष शिंदे)मुंबईतील चेंबूर परिसरासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्पाचा अखेर मार्ग मोकळा झाला असून, शिवसेना-महायुती सरकारकडून या प्रकल्पासाठी मिठागराची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या निर्णयामुळे विशेषत: चेंबूर परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या गंभीर समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. जलनिस्सारण व्यवस्थेत होणाऱ्या सुधारणा यामुळे रस्ते, वसाहती तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे.
या संदर्भात एम-पश्चिम विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनी यापूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देऊन माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. तसेच या गंभीर प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सन २०२३-२०२४ दरम्यान माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी प्रशासनाला या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन त्वरीत निर्णय घेण्याचे सातत्याने आवाहन केले होते. त्या प्रयत्नांना आता यश मिळाले असून शासनाने या प्रकल्पास अखेर मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पामुळे केवळ चेंबूर परिसरातील पाणी साचण्याची समस्या दूर होणार नाही, तर संपूर्ण एम-पश्चिम विभागातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. नागरिकांच्या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
या संदर्भात प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनी प्रशासनाचे या सकारात्मक निर्णयाबद्दल आभार व्यक्त करताना, प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

