महावितरणची दादागिरी..स्मार्ट मीटरवरून पत्रकारांवर गुन्हा दाखल
मुंबई(प्रतिनिधी)-स्मार्ट मीटरच्या मुद्द्द्यावरून ग्राहकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्याऐवजी, या विषयावर चर्चा घडवून आणणाऱ्या माध्यमांचाच आवाज दडपण्याचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या कृतीतून समोर आला आहे.
‘कोकणसाद’ युट्युब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण आणि ग्राहक प्रतिनिधी नंदन वेंगुर्लेकर यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात थेट फौजदारी गुन्हे दाखल करून महावितरणने माध्यमांची मुस्कटदाबी केली आहे.
कोकणसाद युट्युब चॅनेलवर नुकतेच स्मार्ट मीटर संदर्भात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात महावितरणचे अधिकारी आणि ग्राहक प्रतिनिधी दोघांनाही आपली बाजू मांडण्याची समान संधी देण्यात आली होती. या चर्चेदरम्यान ग्राहक प्रतिनिधीने स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा दावा केला. चर्चेचे सूत्रसंचालन जुहिली पांगम या करत होत्या. लोकशाहीत माध्यमांचे काम जनतेच्या शंका आणि प्रशासनाची बाजू समाजासमोर आणणे हे असते
मात्र या दाव्याचे खापर थेट चॅनेलच्या संपादकांवर फोडत महावितरणने त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. केवळ सोशल मीडियावर चर्चेचे रील प्रसारित केल्याच्या कारणावरून गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे, भीती पसरवणे असे गंभीर आरोप एका पत्रकारावर लावणे, हा कायद्याचा आणि अधिकारांचा गैरवापर असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवर गुन्हे दाखल करण्याच्या या दडपशाही प्रवृत्तीमुळे महावितरणच्या पारदर्शकतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

