शेती विषयक

राष्ट्रीय स्तरावरील शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईत किसान सभेची दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक सुरू


मुंबई-अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक आज (२८ जून) मुंबईतील YMCA इंटरनॅशनल हाऊस येथे सुरू झाली असून उद्या (२९ जून) या बैठकीचा समारोप होणार आहे. देशातील शेती आणि शेतकऱ्यांसमोरील विविध गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा करून आगामी देशव्यापी शेतकरी आंदोलनाची दिशा या बैठकीत निश्चित केली जाणार आहे.

या बैठकीस अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष व खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, त्रिपुराचे विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी, बिहारचे आमदार अजय कुमार यांच्यासह देशातील २६ राज्यांतील ७० हून अधिक प्रमुख शेतकरी नेते सहभागी झाले आहेत.

बैठकीत शेतीमालाला हमीभाव, शेती कर्ज, पीक विमा, जमिनीचे हक्क, शेतकरी आत्महत्या, महिला शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच भारत-अमेरिका, भारत-युरोप आणि भारत-न्यूझीलंड व्यापार करारांचा भारतीय शेतीवरील परिणाम या विषयांवर मंथन सुरू आहे.

सध्या देशातील अनेक भागांत खतटंचाईची समस्या गंभीर बनली असून एल-निनोमुळे संभाव्य दुष्काळ आणि खरीप हंगामावरील संकटाबाबतही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी विकास प्रकल्प, महामार्ग आणि कॉर्पोरेट प्रकल्पांसाठी संपादित केल्या जात असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. देशभरातील १,०९५ ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असून सुमारे १.४२ कोटी शेतकरी प्रभावित होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच ४७.७ लाख हेक्टर जमीन संपादित होत असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर देशभरात आंदोलनाची रूपरेषा आखली जात आहे.

शेतीमालाच्या घसरत्या किमती, हमीभावाचा अभाव, कापूस आयात शुल्क रद्द केल्यामुळे कापूस उत्पादक राज्यांतील शेतकऱ्यांची बिकट होत चाललेली परिस्थिती तसेच अन्नधान्य साठवणुकीत खासगी कंपन्यांचा वाढता हस्तक्षेप यावरही बैठकीत चर्चा सुरू आहे. तांदळापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्याने देशाच्या अन्नसुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

ऊस नियंत्रण आदेशातील बदलांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर वेळेत मिळण्यात अडचणी निर्माण होतील, अशी भूमिकाही बैठकीत मांडण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी देशातील शेतीविषयक प्रश्न आणि त्यावरील संघटनेच्या हस्तक्षेपाचा अहवाल बैठकीसमोर सादर केला. या अहवालावर विविध राज्यांतील प्रतिनिधींची चर्चा सुरू असून उद्या बैठकीच्या समारोपावेळी महत्त्वाचे ठराव आणि देशव्यापी शेतकरी आंदोलनाबाबतची भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे.

या राष्ट्रीय बैठकीसाठी देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांचे महाराष्ट्राच्या वतीने डॉ. एस. के. रेगे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, किसन गुजर, शैलेंद्र कांबळे, प्रा. तापती मुखोपाध्याय, जी. एम. व्ही. नायक, प्रा. मधू परांजपे, सईद अहमद, प्राची हातिवलेकर, ॲड. आरमायटी इराणी, विजय पाटील, के. नारायणन, कमल रावत, प्रीती शेखर, अशोक पवार, हरीश गायकवाड, आकाश बागुल, चंद्रकांत शिंदे, दिनेश जाधव आणि परेश सोळंकी यांनी स्वागत केले.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *