सामाजिक

येथे प्रभादेवी येथे महिला कला महोत्सव २०२६ चे आयोजन


मुंबई-(प्रतिनिधी)महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबईच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत महिला कला महोत्सव २०२६ आयोजित केला आहे. या निमित्ताने प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये ५ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत विविधांगी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग व अतिरीक्त कार्यभार महिला आर्थिक विकास महामंडळ नंदिनी आवडे, आएएस, अभिनेत्री राजश्री कुलकर्णी, ख्यातनाम नृत्यांगना सोनिया परचुरे, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टिमीडियाच्या संपादक मृणालिनी नानीवडेकर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.

उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, अशा प्रकारच्या महिला महोत्सवाची संकल्पना केवळ मनात येऊन उपयोगाची नसते, तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट घ्यावे लागतात. यासाठी मीनल जोगळेकर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या टिमचे अभिनंदन करतो. या महोत्सवाचे आयोजन अतिशय विचारपूर्वक करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा गुच्छ सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असल्याने याचा आनंद सर्व रसिकांनी घ्यावा. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर मागील वर्षभरामध्ये जवळपास १००० कार्यक्रम केल्याबद्दल अकादमीचे कौतुक करतो. अकादमीचे प्रांगण म्हणजे कलाविष्काराचा महायज्ञ आहे. प्रत्येक जण आपल्या कलागुणांची समीधा या यज्ञात अर्पण करीत आहे. हाच या महोत्सवाचा खरा हेतू आहे. प्रत्येकाच्या कला सर्जनशीलतेला संधी देणे हेच सरकारचे काम असल्याचेही महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले.

मीनल जोगळेकर म्हणाल्या की, महिला कला महोत्सव २०२६ मध्ये आपण विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘उत्तरा’ डान्स बॅले सादर करण्यात आला आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम करावा यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. सोनिया परचुरे यांच्यासोबत ही संकल्पना शेअर केली आणि महाभारतातील उत्तरा ही व्यक्तिरेखा काय होती ते रसिकांसमोर सादर करूया असे ते म्हणाले. महिला दिनाचे औचित्य साधत उत्तरा रसिकांसमोर येत आहे. मंत्री महोदयांमुळे आम्हालाही सतत नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा लाभते असेही जोगळेकर म्हणाल्या.

उद्घाटनानंतर उत्तरा या नृत्यनाटिकेने खऱ्या अर्थाने महिला कला महोत्सव २०२६ ची सुरुवात करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे आणि शरयू नृत्य कलामंदिर यांनी ही नृत्यनाटिका सादर केली. याची संकल्पना व दिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी तर लेखन मुग्धा गोडबोले यांनी केले आहे.

शिवप्रिया सुर्वे यांचे काव्य असलेल्या या नृत्यनाटिकेमधील पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांच्या बंदिशींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. याला प्रणव हरिदास यांनी संगीत दिले, तर प्रस्तुती पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांची होती. रात्री ८ वाजता मृण्मयी भजक यांनी पुढारी माध्यम समूहाच्या मल्टिमीडियाच्या संपादक मृणालिनी नानीवडेकर यांची मुलाखत घेतली.

६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता सुप्रसिद्ध कवी व लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित ‘संगीत आनंदमठ’ या नाटकाने प्रेक्षकांना देशभक्ती आणि इतिहासाची जाणीव करून दिली. संन्यस्त योद्ध्यांच्या अतुलनीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित या नाटकाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखन विनिता तेलंग यांनी केले असून दिग्दर्शन रविंद्र सातपुते यांचे आहे. संगीत अजय पराड यांनी दिले आहे. सूत्रधार म्हणून मिलिंद सबनीस यांनी भूमिका साकारली. नेपथ्य जयंत टोळे आणि रविंद्र सातपुते, प्रकाशयोजना निखिल मारणे, पार्श्वसंगीत परितोष ठाकूर, रंगभूषा अरविंद सूर्य तर वेशभूषा गायत्री चक्रदेव यांनी केली आहे.

कोलाज क्रिएशन्स निर्मित या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद रसिकांना घेता येत आहे.

महिला कला महोत्सव २०२६ अंतर्गत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा विशेष नृत्यप्रयोग उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ८० वर्षांत ८ हजार वडाची झाडे लावणाऱ्या पद्मश्री सालुमरदा थिमक्का यांना या नृत्यप्रयोगातून अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा नृत्यप्रयोग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. या नृत्यप्रयोगाची संकल्पना व नृत्यसंरचना विदुषी शमा भाटे यांनी साकारली. कार्यक्रमासाठी संगीत संयोजन विनय रामदासन यांचे होते. तर प्रकाश योजना हर्षवर्धन पाठक यांनी केली. वेशभूषा शीतल ओक आणि विदुषी शमा भाटे यांनी साकारली.या नृत्यप्रयोगात अमीरा पाटणकर, श्रेया कुलकर्णी, प्रवती भाटे, समृद्धी चव्हाण, नयन कोहले, पुण्यमयी कुलकर्णी, शलाका कांगे, हिमानी पिले, चिन्मयी केळकर, सांतेरी अभ्यंकर, साक्षी गायकवाड, सानिका गोडसे, इरा गाडगीळ, सई सहस्रबुद्धे या नृत्यकलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.

नाद-रूप आणि आर्टहब यांच्या सहकार्याने सादर झालेल्या या कार्यक्रमाला कला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. पर्यावरणाचा संदेश देणारा आणि नृत्यकलेचा उत्कृष्ट आविष्कार असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला. या कार्यक्रमाला निवेदिका संजना पाटील यांनी काम पाहिले.

महिला कला महोत्सव २०२६ या महोत्सवाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ प्रस्तुत महिला बचतगटाच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याखेरीज महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रस्तुत उजेडाच्या वाटेवर महिला सक्षमीकरणाचे दर्शन हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार संदेश भंडारे यांची छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
शब्दांकन ज्येष्ठ पत्रकार वर्षा कुलकर्णी यांनी केले आहे.

८ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले ‘आॅन द स्पॅाट व्यंगचित्र व फूटमसाज महिलांसाठी खास आकर्षण ठरत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *