चेंबूरच्या लालडोंगर अल्टा विस्टा एसआरए इमारतीला कमी दाबाने पाणी पुरवठा
अनेक तक्रारी व लोकप्रतिनिधींच्या विनंतीनंतरही एम-पश्चिम पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णाच्या निद्रेत
चेंबूर (प्रतिनिधी)-चेंबूर लालडोंगर येथील अल्टा विस्टा एसआरए इमारतीत मागील अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने येथील शेकडो रहिवासी गंभीर अडचणीत सापडले आहेत. नियमित पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले असून, नागरिकांमध्ये पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा अनियमित असून कधी अत्यल्प दाबाने तर कधी पूर्णपणे खंडित स्वरूपात पाणी येत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या गंभीर परिस्थितीबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. तसेच नुकतीच स्थानिक नगरसेविका, आमदार व खासदार यांचे प्रतिनिधी यांनी पालिकेच्या एम-पश्चिम विभागातील पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अल्टा विस्टा एसआरएतील पाणीटंचाई व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवण्याची ठाम मागणी केली होती.
मात्र लोकप्रतिनिधींच्या स्पष्ट सूचनांनंतरही आणि सततच्या तक्रारी करूनही पालिकेच्या एम-पश्चिम पाणीपुरवठा विभागाने या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे येथील शेकडो कुटुंबांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

