ताज्या घडामोडी

लालडोंगर एस.आर.ए. सोसायटीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..!


मोटर दुरुस्तीच्या पैशाची जबाबदारी कोण घेणार..?
यावरून पुन्हा वाद सोसायटीचे पाणी पुन्हा बंद

चेंबूर-(प्रतिनिधी) चेंबूर लालडोंगर येथील अल्टाविस्टा एस.आर.ए. सोसायटीतील पाण्याची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही. टेरेसवर पाणी चढवणाऱ्या मोटर्स बंद पडल्याने संपूर्ण इमारतीतील पाणीपुरवठा ठप्प झाला असून, या मोटर्सची दुरुस्ती कोण करणार आणि त्याचा खर्च कोण उचलणार, हा मुख्य प्रश्न ऐरणीवर आला आहे.

येथील स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या बाबतीत बिल्डरच्या प्रतिनिधींनी पूर्णपणे हात वर केले असून, जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे चित्र येथे निर्माण झाले आहे. याशिवाय सदर इमारतीत वास्तव्यास असलेल्या विविध सोसायट्यांच्या पदाधिकारी आणि सदस्य यांनी ही पाण्यासारख्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. परिणामी, तब्बल २३ मजली इमारतीतील शेकडो रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर इमारती मधील पाण्याच्या मोटर्स बंद असल्याने इमारती मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तळमजल्यावर खाली येऊन पाणी भरावे लागणार असून, याचा सर्वाधिक फटका आणि त्रास येथील ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, महिला आणि लहान बालकांना सहन करावा लागणार आहे.
पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी अशा प्रकारे रहिवाशांना वारंवार वेठीस धरणे अन्यायकारक आणि अमानवी असल्याची तीव्र भावना येथील स्थानिक रहिवाशांमध्ये व्यक्त होत आहे.

या इमारतीत ७ ते ८ सोसायट्यांचे रहिवाशी आणि सोसायटीचे पदाधिकारी वास्तव्यास असतानाही सामूहिक पातळीवर निर्णय घेऊन तातडीने तोडगा काढण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. इमारती मधील टेरेसवरील पाणीपुरवठा यंत्रणा तात्काळ दुरुस्त करावी, त्यासाठी जबाबदारी निश्चित करावी आणि रहिवाशांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी लालडोंगर येथील अल्टाविस्टा एस.आर.ए. सोसायटीतील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *