ताज्या घडामोडी

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले महाराष्ट्र पोलिसांचे DG Loan अखेर मंजूर, सोमवारी खात्यात रक्कम जमा होणार


मुंबई-(प्रतिनिधी)मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठीचा पोलीस गृहअग्रीम कर्ज (DG Loan) प्रश्न अखेर मार्गी लागला असून शासनाने सुमारे 1768 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे राज्यातील पात्र पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर येत्या सोमवारी संबंधित रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या महत्त्वपूर्ण विषयासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करून घेण्यात यश आले असून, त्यामुळे हजारो पोलीस कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

DG Loan संदर्भातील हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास सातत्याने आणण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे, पोलीस बॉईजचे प्रदीप वाघमारे तसेच राज्यातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून हा विषय जिवंत ठेवण्यात आला, ज्यामुळे अखेर या प्रश्नाला सकारात्मक दिशा मिळाली.

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या घरकुलाच्या स्वप्नांना बळ देणारा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून, राज्यभरातील हजारो पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विषयाला अखेर न्याय मिळाल्याची भावना पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *