स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख स्मृती पुरस्कारांचे १४ डिसेंबर रोजी बीड येथे वितरण
पत्रकार, रुग्णमित्र दीपक कैतके, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांचा ही सत्कार
मुंबई-(प्रतिनिधी) बीड देवडी येथील स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी देवडी येथील माणिक बागेत आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार आणि उप मुख्यमंत्र्यांचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी गौरव केला जातो. २०२४ च्या पुरस्कारांसाठी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख सामाजिक सेवा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, किसानपूत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांना जाहीर करण्यात आलेला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली ४५ वर्षे कार्यरत राहून जनतेला न्याय मिळवून देणारे माजलगाव समाचारचे संपादक सुहास देशमुख आणि कृषी क्षेत्रातील अनेक अडचणींवर मात करून शेतीत विविध प्रयोग करणारे शेतकरी गोरख झाटे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व मान्यवरांना १४ डिसेंबर रोजी पोपटराव पवार आणि मंगेश चिवटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने बीड जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. तसेच समाजातील सर्वच स्तरातील गरजू रुग्णांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी अहोरात्र कार्य करणारे मुंबईचे पत्रकार दीपक कैतके आणि मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप सपाटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

