वाचमनवर हल्ल्याच्या निषेधार्थ पाणीपुरवठा बंद- चेंबूरच्या लालडोंगर एस.आर.ए. सोसायटीतील ७५० कुटुंबे पाण्याविना
चेंबूर-(संतोष शिंदे)चेंबूर लालडोंगर येथील एस.आर.ए. सोसायटीमध्ये वाचमनवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर सोसायटी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोसायटीतील एका संतप्त रहिवाशाने वाचमनला मारहाण केल्याच्या निषेधार्थ येथील वॉचमन लोकांनी काल सायंकाळपासून सोसायटीचा पाणीपुरवठा बंद केल्याने तब्बल ७५० कुटुंबे पाण्यापासून वंचित राहिली आहेत.
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे महिला, वृद्ध, लहान मुले तसेच आजारी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण सोसायटीतील रहिवाशांना पाण्यासाठी वेठीस धरणे अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांतून व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत सोसायटी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दरम्यान, घटनेतील दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पाण्यासारखी मूलभूत सुविधा बंद ठेवणे हे अमानवी आणि बेकायदेशीर असल्याचा आरोपही होत आहे. पाणीपुरवठा तात्काळ सुरू करून दोषींवर स्वतंत्र कारवाई करावी तसेच स्थानिक सोसायटी पदाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करुन सोसायटीचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

