धारावी विधानसभा मनसे शाखाध्यक्षपदी विवेक कांबळे यांची नियुक्ती
मुंबई-बाल लैंगिक शोषणमुक्त धारावी अभियान राबवणारे शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कांबळे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धारावी विधानसभा शाखा क्रमांक १८३ च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्राद्वारे ही नियुक्ती अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली असून मनसे चे मुंबई उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
राज ठाकरे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्येय-धोरणानुसार आणि कार्यपद्धतीनुसार काम करताना संघटनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कोणतेही वर्तन होऊ नये. आपल्या पदावर कार्यरत राहून समाजाच्या हितासाठी कार्य करावे आणि पक्षाचे नाव अभिमानाने उंचावावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
विवेक कांबळे यांच्या या नियुक्तीमुळे धारावी परिसरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. आगामी काळात प्रभाग क्रमांक १८३ मधील सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करून प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून जनसामान्यात मनसेची भूमिका अधिक बळकट करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

