पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय दीना पाटील यांची दिलगिरी; माफीनामा जाहीर
मुंबई, प्रतिनिधी- पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्यानंतर ईशान्य मुंबईचे शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांनी अखेर दिलगिरी व्यक्त करत माफीनामा जाहीर केला आहे. या घटनेमुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
खासदार पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात पत्रकारांविषयी आदर व्यक्त करत, आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल खेद व्यक्त केला. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून त्यांच्याविषयी कोणताही अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पत्रकारांना धमकी दिल्याच्या घटनेचा विविध पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद तसेच उपनगर पत्रकार असोसिएशनसह अनेक संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
वाढत्या विरोधानंतर खासदार पाटील यांनी माफी मागितल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, पत्रकार संघटनांनी केवळ माफी पुरेशी नसून भविष्यात पत्रकारांशी सन्मानाने वागण्याची हमी देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

